शहाणपण देगा देवा...
By admin | Published: December 9, 2015 12:11 AM2015-12-09T00:11:28+5:302015-12-09T00:12:48+5:30
बालनाट्य : ‘प्रबोधिनी’च्या बाल कलावंतांचा कलाविष्कार
नाशिक : मानवाकडून निसर्गाची विविध मार्गाने हानी केली जात आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रकोपाचा सामना करण्याची वेळ सजीवसृष्टीवर अनेकदा येते. बिघडलेल्या निसर्गचक्राच्या संतुलनाला माणूसच जबाबदार असल्याचे मुक्या प्राण्यांचे पात्र रंगविणाऱ्या ‘प्रबोधिनी’च्या बाल कलाकारांनी नाट्यमय संघर्षातून रंगमंचावर पटवून देण्याचा प्रयत्न केला.
सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने सुरू असलेल्या तेराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी बाल कलावंतांची एकूण पाच नाटके सादर झाली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या स्पर्धेदरम्यान, सकाळी पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्राजक्ता पंचाक्षरी लिखित व दिग्दर्शित ‘पंखातील आभाळ’ हे नाटक सादर केले. यामध्ये निकीता काकळीज, तेजस्विनी ठाकरे, शिवानी व्यवहारे, साधना रणमाळ, साक्षी पवार, वेदश्री गडाख आदिंच्या भूमिका होत्या. यानंतर प्रबोधिनी विद्यामंदिराच्या गतिमंद विद्यार्थ्यांनी ‘शहाणपण देगा देवा’ या नाटकातून निसर्गावर मानवाचा विविध मार्गाने होणारा हल्ला व त्यानंतर येणारी नैसर्गिक आपत्ती यावर प्रकाशझोत टाकला. या नाटकाचे लेखन मनीषा नलगे व दिग्दर्शन रमेश वनीस यांनी केले. यामध्ये नवनीत वाघ, सौरभ साळुंके, हिमांशू गोस्वामी, निखील पवार, कौस्तुभ शर्मा, प्रतीक शिंदे, हर्ष जोशी आदिंच्या भूमिका होत्या.
अहमदनगरच्या सप्तरंग थिएटर्सच्या वतीने ‘सर... तुम्ही गुरुजी व्हा’ हे नाटक सादर करण्यात आले. त्र्यंबक वडसकर लिखित व दीपक ओहोळ दिग्दर्शित या नाटकामध्ये आकांक्षा शिंदे, संस्कार गुंदेचा, श्वेता दरंदले, गायत्री आहोळ, गंधाली जोशी आदिंच्या भूमिका होत्या. भुसावळच्या अहल्यादेवी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वीज पेरुया अंगात’ या नाटकाचे सादरीकरण केले. ज्ञानेश्वर गायकवाड लिखित व सोनाली वासकर दिग्दर्शित या नाटकात टिना नेमाडे, प्राची खरादे, धनश्री चौधरी, साक्षी भटकर, खिल्लेश्वरी सोनार, सीमरन तडवी आदिंनी विविध भूमिका साकारल्या. शेवगावच्या भारदे उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘अवताराची गोष्ट’ नाटकाचे सादरीकरण केले. यामध्ये मुग्धा घेवरीकर, साक्षी झोटिंग, प्रणव नागरगोजे, ऋषिराज दहिफळे आदिंच्या भूमिका होत्या. (प्रतिनिधी)