निवडणूक लढणार, पक्षचिन्हाचा पत्ताच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:39 AM2019-09-24T01:39:58+5:302019-09-24T01:41:20+5:30
विधानसभा निवडणूक लढायची तर आहे; परंतु पक्ष उमेदवारी देईल किंवा नाही याचा पत्ता नाही, उमेदवारी नाही मिळाली तर पक्षांतर करायचे किंवा अपक्ष निवडणूक लढवायचीच आहे.
नाशिक : विधानसभा निवडणूक लढायची तर आहे; परंतु पक्ष उमेदवारी देईल किंवा नाही याचा पत्ता नाही, उमेदवारी नाही मिळाली तर पक्षांतर करायचे किंवा अपक्ष निवडणूक लढवायचीच आहे. अशा कुंपणावरील इच्छुकांनी अजब शक्कल लढविली आहे. त्यांनी पक्षाच्या नेत्याच्या छबीपेक्षा कुटुंबातील राजकीय वारसा दाखवण्यासाठी अशा कुटुंबातील व्यक्तिंच्याच छबी प्रचारपत्रकांवर छापल्या आहेत.
नाशिक शहरात यंदा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरे फारशी झाली नसली तरी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र पक्षांतरे वाढणार आहेत. त्याची चाहुल मात्र आत्ताच लागली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी कधी नव्हे इतकी इच्छुकांची संख्या वाढली आहे. निवडणूक लढवायचीच या इराद्याने प्रचारात अनेक जण इच्छुक असून त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल याची खात्री नाही. पूर्व नाशिकमधील एका इच्छुकाची तर भलतीची अडचण झाली आहे.
मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि आपल्या पिताश्रींचे चित्र वापरून या उमेदवाराने प्रचारपत्रकेही छापली. परंतु नंतर राज ठाकरे यांनी निवडणूक लढवायची नाही असे ठरविले. त्यामुळे या इच्छुकाने त्यांची छबी गायब करून पत्रके छापली आणि त्याचे वितरण सुरू केले. आता राज यांनी निवडणूक लढवायची, असा निर्णय घेतल्यानंतर मात्र संबंधितांनी पुन्हा राज यांची छबी वापरण्यास प्रारंभ केला आहे.
राजकीय वारसासाठी माता-पित्याची छबी
नाशिक पश्चिममधील एका राज्यस्तरीय पक्षाच्या इच्छुकाने अनेक पक्षांतरे केल्यानंतर राष्टÑवादीकडे उमेदवारी मागितली खरी; परंतु पक्षाची भूमिका स्पष्ट होत नाही. त्यामुळे या इच्छुकाने आपला राजकीय वारसा सांगण्यासाठी माता-पित्यांच्या छबींचा वापर सुरू केला आहे.
पक्षाने उमेदवारी दिली, तर ठीक नाही तर अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे संबंधित कार्यकर्ते सांगत आहेत, तर अन्य काही इच्छुकांनी पक्षाने उमदेवारी न दिल्यास अन्य पक्षांकडून निवडणूक लढवायची असे सांगून त्यावर पक्षचिन्हच प्रसिद्ध केलेले नाही.