किमान हजार किन्नरांचे पुनर्वसन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:56 PM2019-09-14T22:56:18+5:302019-09-15T00:18:22+5:30
निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० किन्नरांचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करणार असल्याचा निर्धार उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अॅड. बी. के. बर्वे यांनी व्यक्त केला.
नाशिक : निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० किन्नरांचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करणार असल्याचा निर्धार उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अॅड. बी. के. बर्वे यांनी व्यक्त केला.
मंगलमुखी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने आयोजित आदर्श समाजसेवा पुरस्कार आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, तहसीलदार राजश्री अहिरराव, अनिता डांगळे, अतुल निकुंभ आणि संस्थेच्या अध्यक्ष पायलगुरू गवारे उपस्थित होते. यावेळी बोलताना बर्वे यांनी डॉ. आंबेडकर यांनी गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना माणूस बनवून मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. तसेच तृतीयपंथीयांनादेखील मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे अॅड. बर्वे यांनी नमूद केले. यावेळी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी पायलगुरू यांच्या संकल्पनेनुसार नाशिकमध्ये किन्नरांसाठी आश्रम आणि वृद्धाश्रम स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाने तृतीयपंथीयांची मतदार म्हणून नोंदणी करणे तसेच तृतीयपंथीयांनादेखील निराधार योजनेत पेन्शन सुरू करण्याचे पाऊल उचलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने पावले टाकली असल्याचे नमूद केले. यावेळी राजेंद्र कलाल यांच्या हस्ते आदर्श समाजसेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पायलगुरू गवारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले.
...तर तुम्ही देशद्रोही
जन्मत:च निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. निसर्गाने तुम्हाला पुरुष किंवा स्त्री बनवून न्याय केला म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना तुम्ही लांब करणार असाल तर तुम्ही समाजद्रोही आणि देशद्रोही आहात. कारण किन्नरदेखील या समाजाचेच आणि देशाचेच घटक असल्याचेही अॅड. बर्वे यांनी सांगितले.