‘त्या’ फटाक्याच्या दारूची स्फोटक क्षमता तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:27 AM2021-03-04T04:27:30+5:302021-03-04T04:27:30+5:30
ठक्करनगरमध्ये मंगळवारी भरदुपारी आढळलेली बॉम्बसदृश वस्तू यशस्वीपणे निकामी करत पोलिसांनी यामध्ये आढळून आलेली फटाक्याची स्फोटक दारू जप्त केली आहे. ...
ठक्करनगरमध्ये मंगळवारी भरदुपारी आढळलेली बॉम्बसदृश वस्तू यशस्वीपणे निकामी करत पोलिसांनी यामध्ये आढळून आलेली फटाक्याची स्फोटक दारू जप्त केली आहे. बॉम्ब शोधक- नाशक पथकाकडून या पावडरची तपासणी केली जात असून, या पावडरची मात्रा आणि प्रकार लक्षात घेत स्फोटक तीव्रता पडताळणी करण्याच्या सूचना बीडीडीएस पथकाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, सरकारवाडा पोलिसांकडून तसेच गुन्हे शाखेच्या पथकांकडून भागातील विविध बंगले, अपार्टमेंट, दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली जात आहे. ज्याठिकाणी बॉम्बसदृश वस्तू रस्त्यावर पडलेली आढळली त्या पूजा अपार्टमेंटच्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांकडून मिळविले जात आहे. कोणी अज्ञात व्यक्ती या रस्त्यावरून पहाटेच्या सुमारास ये-जा करताना, काही वस्तू बेवारसपणे फेकताना सीसीटीव्हीत कैद झालेली दिसून येते का? याबाबत पडताळणी सुरू आहे. यासाठी काही सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ही बॉम्बसदृश वस्तू याठिकाणी कोणी व अशा पद्धतीने ठेवण्याच्या कारणामागचे गूढ अद्यापही कायम आहे.
---इन्फो---
त्या हॅण्डग्रेनेडसदृश चेंडूचा पाच सुतळी बॉम्बसारखा आवाज झाला असता, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ज्याप्रमाणे दिवाळीत जास्त आवाजाचे सुतळी बॉम्बसारखे फटाके फोडले जातात त्या पद्धतीची स्फोटक गन पावडर या चेंडूत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या चेंडूला लावलेल्या वातीचा जर ज्वलनशील पदार्थाशी संपर्क आला असता, तर कदाचित मोठा फटाका फुटल्याचा आवाज या परिसरात झाला असता, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
फोटो -
===Photopath===
030321\03nsk_50_03032021_13.jpg
===Caption===
पावडर