सटाण्यात प्रसुतिदरम्यान महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:52 PM2019-08-29T17:52:31+5:302019-08-29T17:53:59+5:30
परिचारिकांनी केली प्रसुति : सखोल चौकशीची मागणी
सटाणा : बागलाण तालुक्यात आरोग्य विभाग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिका-याऐवजी परीचारीकांनीच प्रसुती केल्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन जामोटी येथील एकोणवीस वर्षीय आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरु वारी (दि.२९) उघडकीस आली आहे. या घटनेची जायखेडा पोलिसांत नोंद करण्यात आली असून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.
तालुक्यातील जामोटी येथील रहिवासी पूजा लखन सोनवणे (१९) ही गर्भवती महिला अंतापूर येथे माहेरी प्रसुतीसाठी आली होती. बुधवारी (दि.२७) सायंकाळी या महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिला तत्काळ ताहाराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री २ वाजता स्त्रीरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी हजर नसतांना परिचारिकांनी प्रसूती केली. मात्र प्रसुतीनंतरही अतिरक्तस्त्राव सुरूच राहिल्याने पुढील उपचारासाठी सटाणा ग्रामीण रु ग्णालयात हलविण्याच्या सूचना नातेवाईकांना देण्यात आल्या. रात्री दोन वाजेच्या सुमारास सटाण्याकडे नेत असतांना करंजाडजवळच सदर महिलेची प्राणज्योत मालवली . येथील ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागातील दुर्लक्षामुळे गेल्या तीन महिन्यांत सर्पदंश झालेल्या दोन आदिवासी महिलांना उपचाराभावी प्राण गमवावे लागले तर वनोली येथील पाच दिवसाच्या आदिवासी बाळावर उपचार न केल्याने त्याला देखील प्राण गमवावे लागले. याशिवाय ठेंगोडा येथील लष्करी जवानाच्या पत्नीबद्दलही हेळसांड झाल्याचा आरोप केला गेला आहे. आता गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने सदर प्रकरणाची मृत्यूची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
कारवाई नाही
खासगी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांचे संगनमत आहे. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. माझ्या सुनेची गंभीर प्रकृती असतांना सटाणा ग्रामीण रु ग्णालयातील वैद्यकीय अधिका-याने उपचार न करता खासगी दवाखान्यात जाण्यास भाग पाडले. याबाबत आम्ही आरोग्य विभागाच्या १०४ क्र मांकावर तक्र ार केली आहे. मात्र अजून कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
- सुनील गणपत बागुल, महिलेचे सासरे