झोपलेला बिबट्या पाहताच महिलेला आली भोवळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 01:08 AM2021-05-29T01:08:47+5:302021-05-29T01:09:08+5:30

सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात शनिवारी (दि.२८) सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक महिला वालवडीच्या शेतात कामाला गेली होती. त्यावेळी एका सरीवर तिला बिबट्या पडलेला दिसला. त्या बिबट्याला पाहून सदर महिलेची घबराट होऊन तिला जागेवरच भोवळ आली; पण स्वत:ला सावरत व आरडाओरड करीत  तिने तेथून पलायन केले.  

The woman felt dizzy when she saw the sleeping leopard! | झोपलेला बिबट्या पाहताच महिलेला आली भोवळ!

झोपलेला बिबट्या पाहताच महिलेला आली भोवळ!

Next
ठळक मुद्देचापडगाव शिवारातील घटना : शेतकऱ्यांनी पाहणी केल्यावर निघाली मृत मादी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात शनिवारी (दि.२८) सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक महिला वालवडीच्या शेतात कामाला गेली होती. त्यावेळी एका सरीवर तिला बिबट्या पडलेला दिसला. त्या बिबट्याला पाहून सदर महिलेची घबराट होऊन तिला जागेवरच भोवळ आली; पण स्वत:ला सावरत व आरडाओरड करीत  तिने तेथून पलायन केले.  
शेतकऱ्यांनी येऊन खात्री केली असता, सदरचा बिबट्या मृत असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, न्युमोनिया आजाराने बिबट्या मादीचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने सांगितले.
  तालुक्यातील दापूर व  चापडगाव शिवार हा बागायती परिसर आहे. भोजापूर धरणामुळे या भागात पिकांसाठी बारमाही पाणी उपलब्ध असते. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात बागायती पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो, तसेच डोंगराळ भाग असल्याने या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. सिन्नर - अकोले रस्त्यालगत चापडगाव शिवारात गट नंबर ५२ मध्ये रेवजी चिमा आव्हाड यांची शेतजमीन आहे. मंगला आगिवले (३७) ही महिला सकाळी शेतात काम करण्यासाठी गेली होती. शेतात बिबट्या झोपलेला असल्याची माहिती आजूबाजुच्या शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांनाही आश्चर्य वाटले. महिलेने आरडाओरड केल्यानंतरही बिबट्या जागचा हलला कसा नाही. ही महिला गणेश रामनाम आव्हाड यांची शेतजमीन हिश्श्याने करते. परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांनी दबक्या पावलांनी शेतात प्रवेश केला. पडलेल्या बिबट्याचा अंदाज घेत एकेक पाऊल पुढे टाकले. तरी बिबट्या निद्राधीन. लांबूनच खडाही टाकून पाहिला; मात्र बिबट्याची काहीच हालचाल दिसेना. मग दोन-चार जणांनी धाडस दाखवत पुढे जाऊन शहानिशा केली असता, बिबट्या मृत आढळून आला. शेतमालक आव्हाड यांनी वन विभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल प्रीतेश सरोदे, के. आर. इरकर आदींसह कर्मचारी दाखल झाले. 
न्युमोनिया व उपासमारीने मृत्यू 
वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन वर्षीय मृत मादी बिबट्याला शवविच्छेदनासाठी दोडी येथे हलविले. पशुधन विकास अधिकारी 
वर्पे यांनी शवविच्छेदन केले. त्यात मादी बिबट्याला न्युमोनिया झालेला 
आढळून आला. न्युमोनियामुळे तिच्या अंगात शिकार करण्यासाठी त्राण उरले नसावेत आणि त्यातच उपासमार झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. माळेगाव- मोहदरी येथील वनोद्यानात या मादी बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांनी भेट 
देऊन घटनेची माहिती घेतली.
 

Web Title: The woman felt dizzy when she saw the sleeping leopard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.