पंचवटी : दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात असलेल्या संघवी नक्षत्र इमारतीसमोरील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी एका पादचारी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना सोमवारी (दि.२३) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गायत्रीनगर येथील अवंतिका बंगल्यात राहणाऱ्या मंदाकिनी प्रेमचंद भोगे (५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या साडेआठ वाजेच्या सुमाराला भोगे व त्यांच्या ओळखीच्या महिला माधवी चौधरी अशा दोघी जणी दिंडोरीरोडवर असलेल्या गणेश मंदिराकडे पायी चालत जात होत्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी दुचाकीचा वेग कमी करत भोगे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी ओरबाडून धूम ठोकली. या घटनेनंतर भोगे आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी आरडाओरड केली; मात्र चोरटे वेगाने पसार झाले. विशेष म्हणजे म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अद्यापपर्यंत तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत; मात्र एकही गुन्हा उघडकीस येऊ शक लेला नाही.देवीच्या दर्शनासाठी महिला विविध भागांमधून पायी पहाटे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात दाखल होतात. रात्री उशिरादेखील या भागातून महिलांची वर्दळ नवरात्रोत्सवात असणार आहे. त्यामुळे मुंबईनाका पोलीस ठाण्यासह शहरातील अन्य सर्वच पोलीस ठाण्यांची जबाबदारी वाढली असून, पोलिसांना आपापल्या हद्दीत दिवस-रात्र गस्त अधिक सतर्कतेने करावी लागणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गुन्हे वाढण्याची शक्यताअवघ्या चार दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात महिला, युवती मोठ्या संख्येने सकाळी आणि रात्री घराबाहेर पडतात. यावेळी पुन्हा अशाप्रकारचे गुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दुचाकीस्वार चोरटे सकाळी आणि सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढत असल्याचे अद्याप घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे. कालिकामातेची यात्रादेखील रविवारपासून (दि.२९) सुरू होत आहे.
महिलेची सोनसाखळी पुन्हा हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:49 AM