हेल्मेट जनजागृतीसाठी नाशिकमध्ये महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी दुचाकीवर स्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 10:11 PM2018-01-07T22:11:32+5:302018-01-07T22:14:58+5:30
सुरक्षित वाहतूकीबाबत जनप्रबोधन करणारे विविध उपक्रम राबविले जातात. या औचित्यावर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी संध्याकाळी शहरातून हेल्मेटधारक दुचाकीस्वार महिला पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची फेरी काढण्यात आली.
नाशिक : वाहतूक पंधरवड्यानिमित्त महिला पोलीस कर्मचारी व अधिका-यांसह नाशिककर महिलांनी दुचाकीवर स्वार होत हेल्मेट परिधान करुन रविवारी (दि.७) फेरी काढली.
सुरक्षित वाहतूकीसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हेल्मेट वाहतुक सुरक्षा पंधरवडा कार्यक्रम साजरा केला जातो. याअंतर्गत सुरक्षित वाहतूकीबाबत जनप्रबोधन करणारे विविध उपक्रम राबविले जातात. या औचित्यावर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी संध्याकाळी शहरातून हेल्मेटधारक दुचाकीस्वार महिला पोलीस अधिकारी-कर्मचा-यांची फेरी काढण्यात आली.
दुपारी त्र्यंबकरोडवरील अनंत कान्हेरे मैदानापासून फेरीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी अग्रभागी पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे, सहायक पोलीस निरिक्षक सारिका अहिरराव होत्या. दरम्यान, दुचाकी फेरी त्र्यंबकनाका, सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूररोडने जुना गंगापूरनाका कॅनडा कॉर्नरमार्गे, त्र्यंबकरोडवरून मार्गस्थ होत कान्हेरे मैदानावर पोहचली. या फेरीमध्ये पोलिसांसह काही महिलाही हेल्मेट परिधान करुन सहभागी झाल्या होत्या. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर अवश्य करावा, रस्ते अपघातात होणारे मृत्यू टाळावे, असा संदेश या फेरीच्या माध्यमातून देण्यात आला.