नाशिक महापालिकेतील स्थायी समितीत ‘महिला राज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:54 PM2018-03-07T15:54:09+5:302018-03-07T15:54:09+5:30
९ महिला सदस्य : पहिल्यांदाच सभापतीपदी महिलेला संधी मिळण्याचे संकेत
नाशिक - महापालिकेची आर्थिक रक्तवाहिनी समजल्या जाणाºया स्थायी समितीच्या सभापतीपदाची सूत्रे पहिल्यांदाच महिलेच्या हाती जाण्याचे संकेत मिळत आहेत. स्थायी समितीवर रिक्त झालेल्या ५ जागांवर सत्ताधारी भाजपाने महिला सदस्यांना संधी दिल्याने आता समितीत १६ सदस्यांमध्ये तब्बल ९ महिला सदस्य असणार आहेत. दरम्यान, सभापतीपदासाठी माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब अहेर यांच्या सुकन्या हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव आघाडीवर आहे.
महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य चिठ्ठी पद्धतीने निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागांवर तौलनिक संख्याबळानुसार, भाजपाचे दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, शिवसेनेचे संतोष साळवे व संगीता जाधव, कॉँग्रेसचे समीर कांबळे आणि राष्टÑवादीच्या सुषमा पगारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शिवेसेनेचे प्रवीण तिदमे आणि भागवत आरोटे व मनसेच्या कोटयातील अपक्ष मुशीर सैय्यद यांचे पक्षाने अद्याप राजीनामे न घेतल्याने त्यांचे सदस्यत्व कायम आहे. भाजपाने उर्वरित सदस्य व सभापती शिवाजी गांगुर्डे यांचेसह सीमा ताजणे, विशाल संगमनेरे, श्याम बडोदे आणि सुनीता पिंगळे यांचे राजीनामे घेतले. त्यामुळे, त्यांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि.७) विशेष महासभा बोलाविली होती. त्यानुसार, झालेल्या महासभेत भाजपाने पाचही जागांवर महिलांना संधी देत मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया, भिकुबाई बागूल, हिमगौरी अहेर-आडके आणि शांताबाई हिरे या सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे, स्थायी समितीवर आता एकूण १६ सदस्यांपैकी ९ महिला सदस्य असणार आहेत. त्यात भाजपाच्या ७, शिवसेना आणि राष्टवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. परिणामी, स्थायीवर महिला राज दिसून येणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून सभापतीपदाच्या शर्यतीत आता सभागृहनेता दिनकर पाटील, माजी सभापती उद्धव निमसे आणि माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांच्या पुतणी आणि माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब अहेर यांच्या सुकन्या हिमगौरी अहेर-आडके यांची नावे अग्रभागी आहेत.
हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव आघाडीवर
महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यापासून एकदाही स्थायी समितीच्या सभापतीपदी महिलेला संधी मिळालेली नाही. महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने यंदाही भाजपाचाच सभापती होणार आहे. पहिल्या वर्षी कॉँग्रेसमधून भाजपात आलेल्या शिवाजी गांगुर्डे या बिगर भाजपेयीस सभापतीपदाची सूत्रे देण्यात आली होती. यावर्षी मूळ भाजपेयींना संधी मिळावी यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यात हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव पुढे आलेले आहे. दिनकर पाटील व उद्धव निमसे हे दोन्हीही अन्य पक्षातून भाजपात दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याबाबत पक्षात मतभेद आहेत. मात्र, दिनकर पाटील व उद्धव निमसे यांनीही सभापतीपदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. हिमगौरी यांना सभापतीपद मिळाल्यास अहेर कुटुंबीयात वीस वर्षानंतर पुन्हा एकदा सभापतीपद जाणार आहे. १९९७-९८ मध्ये बाळासाहेब अहेर यांनी सभापतीपद भूषविले होते.