दिंडोरीत महिलांची भटकंती ; पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:37 AM2019-04-20T00:37:35+5:302019-04-20T00:37:59+5:30
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे.
वणी : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे. देवसाणे, चौसाळे, चारणवाडी, सारसाळे, करंजखेड, एकलहरा, पिंगळवाडी, खोरी ही आदिवासी बहुल गावे असून, या व लगतच्या भागातील शेतजमिनीतील विहिरींनी तळ गाठला आहे.
शेती व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुरेशा पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी कुठून उपलब्ध करायचे ही समस्या उभी ठाकली आहे. ग्रामस्थांनाही पिण्यासाठी पाणी मिळविण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते आहे. सद्यस्थितीत एकलहरा व करंजाळी येथील धरणातून ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे; मात्र धरणसाठ्याची पाण्याची पातळी पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत देत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरी खोदण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वामनराव राऊत यांनी दिली.
एक परस म्हणजेच सात फूट विहीर खोदण्यासाठी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च येतो. काही भागात पाणी जमिनीत किती फुटावर लागू शकते याच्या चाचपणीसाठी अधिक खोदकामही करावे लागते. सदर खर्चाचा आवाका मोठा असल्याने आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना हा खर्च पेलणारा नाही.
जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने धरणालगतच्या क्षेत्रातील पाण्याचा वापर सध्या करावा
लागतो आहे. जनावरांना चारा नसल्याने गव्हाचा तुस व भाताचा कोंडा याचा वापर करावा लागतो आहे. हिरवा चारा दाट जंगली भागात असला तरी बिबट्या अस्वल, या जंगली श्वापदांच्या भीतीमुळे जनावरांना मोकळे सोडता येत नाही. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आदिवासी बांधवांची झाली आहे.
पशुपालक हवालदिल
जनावरांना चारा-पाणी अत्यल्प असून, त्यांची भूक भागविण्यासाठी जंगलातही सोडता येत नसल्याने डोळ्यादेखत गुरांचे हाल पाहण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही या भागात पाचवीला पूजलेली, हा प्रतिवर्षीचा अनुभव आहे; मात्र ठोस उपाययोजनेअभावी आदिवासी भागाची परवड सुरूच असून, मागील वर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने स्वत:च्या शेती व्यवसायासाठी पाणी वापरले नाही. ते पाणी जनतेसाठी टँकरच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती संगीता राऊत यांनी दिली. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करणाºया ग्रामस्थांसाठीची समस्या सोडविणेकामी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.