कामही पूर्ण नाही, तोच स्मार्ट रोडवर खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:25 AM2019-07-24T00:25:25+5:302019-07-24T00:25:45+5:30

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याचे अद्याप कामही पूर्ण झाले नाही तोच रस्त्यांवर मात्र खड्डे पडले आहेत. नवीन रस्त्यावर अनेक प्रकारच्या अर्धवट कामांमुळे सफाईदारपणा नसून एकंदरच रस्ता किती तग धरेल, याविषयी शंकाच निर्माण झाली आहे.

 Work is not complete, it pits on the smart road! | कामही पूर्ण नाही, तोच स्मार्ट रोडवर खड्डे!

कामही पूर्ण नाही, तोच स्मार्ट रोडवर खड्डे!

Next


आॅन दी स्पॉट

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याचे अद्याप कामही पूर्ण झाले नाही तोच रस्त्यांवर मात्र खड्डे पडले आहेत. नवीन रस्त्यावर अनेक प्रकारच्या अर्धवट कामांमुळे सफाईदारपणा नसून एकंदरच रस्ता किती तग धरेल, याविषयी शंकाच निर्माण झाली आहे.
स्मार्ट सिटीचा पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून स्मार्ट रोडकडे बघितले गेले. त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ यादरम्यान होणाऱ्या या स्मार्ट रोडविषयी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने असे काही चित्र रंगवले होते की रस्ता पूर्ण झाल्यानंतर जणू विदेशात आल्यासारखे वाटेल. रुंद रस्ता, त्याच्या बाजूला सायकल ट्रॅक मग पादचारी मार्ग त्यावर मध्ये मध्ये बसण्यासाठी बाक त्यानंतर मध्ये झाडे लावणार आणि सर्वात महत्त्वाचे वायफाय सेवा देणार, परंतु हे स्वप्नच राहिले आहे. आता साधा रस्ता पूर्ण झाला तरी खूप झाले अशी त्रस्त नागरिकांची भावना झाली आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असून मुख्य रहदारीचा रस्ताच बंद झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
कंपनी आणि महापालिकेकडे तक्रारी करूनही ठेकेदाराला पाठीशी घालत गेल्याने ठेकेदार तारीख पे तारीख करीत असून, कंपनी आणि महापालिका त्यावर काही न करता ठेकेदाराची भलामण करताना दिसत आहेत. ठेकेदार डेडलाइन पाळत नसेल तर किमान दंड तर करा, अशी मागणी होऊन त्यालाही वेळ घालविण्यात आला. आता ठेकेदाराने ३१ आॅगस्ट ही अखेरची मुदत दिली असली तरी यात काम होईल काय याविषयी शंका आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काम होईल, परंतु त्याच्या एकंदर दर्जाचे काय असा प्रश्न आहे. रस्त्याच्या एका बाजूचे कामही पूर्ण झाले नाही तोच खड्डे पडले आहेत. सायकल ट्रॅकसाठी लावलेल्या मार्किंग निघून आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा गांधी रोडसारखा रस्ता गुळगुळीत नाही, अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे रस्ता झाला तरी किती टिकेल, याविषयी शंकाच आहेत.
दिवसाला ३६ हजार  दंड पण...
स्मार्ट सिटी कंपनीने संबंधित ठेकेदाराला १ एप्रिलपासून प्रतिदिन ३६ हजार रुपये दंड केला आहे. परंतु दुसरीकडे याच ठेकेदाराला ३ कोटी ८९ लाख रुपये जादा रक्कम मंजूर केली आहे. त्यामुळे ठेकेदाराला तोशीस ती काय लागणार? रस्त्याच्या कामातून अनेक कामे वगळली गेल्याने रस्त्याची किंमत कमी होण्याची अपेक्षा असताना दुसरीकडे मात्र ठेकेदाराला ४ कोटी रुपयांची बिदागी कशासाठी असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावर अनेक खड्डे
रस्त्याचे काम पूर्णही झालेले नाही, परंतु झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कामाचे कोणत्याही प्रकारे फिनीशिंग झाले नसून ठिकठिकाणी अर्धवट झालेले काम, मटेरियल पडून आहे. ज्या भागातील रस्ता पूर्ण झाला तेथेच अशी अवस्था असून पुढे काय होणार? असा प्रश्न आहे.
ओबडधोबड रस्ते
महापालिकेने महात्मा गांधी रोड हा ट्रिमिक्स पद्धतीने केला असून, त्याला कोणत्याही प्रकारचे खड्डे पडलेले नाहीत तसेच रस्ता अत्यंत गुळगुळीत आहे. नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर पहिल्या पंचवार्षिकमध्ये तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर आज एक खड्डा नाही की महापालिकेला रुपयाही खर्च आलेला नाही. मात्र स्मार्ट रोडवर चालतानाच ओबडधोबड रस्त्यामुळे गाडी उडत चालते, अशी तक्रार आहे.
४त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या बाजूचे काम सध्या सुरू असल्याने नागरिकांचे हाल कायम आहेत. विशेषत: जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी येणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्या बाजूचे सध्या काम सुरू आहे त्या बाजूचे व्यवसाय तर पूर्णत: ठप्प झाले आहेत.
वाहनतळच नाही
महापालिकेने हा रस्ता तयार करताना मेहेर ते अशोकस्तंभ आणि त्र्यंबक नाका ते सीबीएस या दोन्ही रस्त्यांवर दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संकुले आहेत. परंतु त्यांच्यासाठी वाहनतळाची कोठेही जागा सोडलेली नाही. त्यामुळे ज्याला सायकल ट्रॅक म्हटले जात आहे त्याठिकाणी दुचाकी आणि चारचाकी उभ्या राहत आहे तर अनेक ठिकाणी तीही सोय नसून त्यामुळे व्यवसायच ठप्प होणार असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे.
स्मार्ट रोडखाली गटारींची व्यवस्था नाही?
सर्व सर्व्हिस लाइन्स आणि पाइपलाइन्स या रस्त्याखाली घालून त्यानंतर भविष्यात रस्ता फोडण्याची वेळ येणार नाही अशी व्यवस्था असल्याचे सांगितले जात आहे. मात्र स्मार्ट रोडखाली भूमिगत गटारींची कोणतीही व्यवस्थाच नसल्याचा आरोप स्मार्ट सिटीचे संचालक आणि कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनी केला आहे.
याशिवाय याठिकाणी रस्त्याच्या खाली असलेल्या रायझिंग मेनवरून नळ जोडण्या दिल्याचीदेखील त्यांची तक्रार आहे.
रायझिंग मेन म्हणजेच जलकुंभ भरणाºया मुख्य जलवाहिकांवर नळ जोडणी देता येत नाही. असे असतानाही मेहेर परिसरात सध्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथे मुख्य जलवाहिनीवरून नळ जोडणी दिली जात असल्याची तक्रार आहे.
रस्ता झाला अरुंद...
मूळ संकल्पानुसार रस्ता रुंदीकरण न करताच स्मार्ट रोड करण्यात येत आहे. पादचारी मार्ग आणि त्यानंतर सायकल ट्रॅक यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, अशावेळी वाहतुकीची कोंडी अधिक होण्याची शक्यता आहे. शिवाय रिक्षा थांबे आता कुठे ठेवणार हादेखील प्रश्न आहे.
या मार्गावर दोन्ही बाजून व्यावसायिक गाळे तसेच दुकाने, रुग्णालये असल्यामुळे त्यांच्याकडे येणाºया ग्राहकांची वाहने कुठे पार्क करावे याचेही नियोजन नाही़

Web Title:  Work is not complete, it pits on the smart road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.