मजूर म्हणून कामाला आले अन् सव्वा लाखांचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 06:05 PM2019-03-27T18:05:58+5:302019-03-27T18:07:38+5:30
गेल्या आठवड्यापासून पत्रे बदलण्याचे काम सुरू असल्याने वैभव संजय सूर्यवंशी, ऋषिकेश अनिल घोलप हे दोघे काम करण्यासाठी येत होते.
नाशिक : दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात इमारतीच्या फ्लॅटमध्ये टेरेसचे पत्रे बदलण्याच्या कामासाठी आलेल्या दोघा मजुरांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून सुमारे सव्वा लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साईसेवा सोसायटीत राहणाऱ्या जानकीराम वामन पाटील यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीची तक्र ार दाखल केली असून, पोलिसांनी दोघा संशयित मजुरांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, गायत्रीनगर परिसरातील साई सेवा सोसायटीमधील पाटील यांच्या घरात असलेल्या टेरेसचे पत्रे बदलण्याचे काम सुरू असून, सदर कामासाठी मजूर लावण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून पत्रे बदलण्याचे काम सुरू असल्याने वैभव संजय सूर्यवंशी, ऋषिकेश अनिल घोलप हे दोघे काम करण्यासाठी येत होते. त्यांनी टेरेसमध्ये ठेवलेल्या कपाटातून दोघा संशयित आरोपींनी कानातील झुबे, वेल, रिंग असा सुमारे सव्वा लाख रु पयांचा ऐवज चोरून नेला सदरची घटना पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार संशयित सूर्यवंशी व घोलप या दोघा मजुरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेले दोघेही संशयित सिडकोचे रहिवासी आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.