नाशिक : एक वर्षाची असतानाच आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे पितृछाया हरपलेल्या मुलीची काय अवस्था होऊ शकते याची सुरेल मांडणी करणाऱ्या ‘नथिंग टू से’ या नाटकात वडील-मुलीच्या नात्यातील गुंफण अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आली. महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित केलेल्या कामगार कल्याण नाट्य महोत्सवात श्रीपाद केदार यांनी दिग्दर्शित केलेल्या व प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टू से’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेल्या या नाटकाचे अतिशय प्रभावीपणे सादरीकरण केले. मृण्मयी जेव्हा एक वर्षाची असते, तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट होतो. त्यामुळे तिच्यावरील पितृछाया हरपते. पुढे २५ वर्षांनंतर ती वडिलांकडे येते. आयुष्याची २५ वर्षे वडिलांविना जगलेल्या मुलीची काय अवस्था होऊ शकते, असा जाब ती वडिलांना विचारते. अशात तिला जिंग्या नावाचा मित्र भेटतो. मात्र तो कधीही तिला भेटलेला नसतो. केवळ मोबाइलच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद होत असतो. मृण्मयीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढउताराबाबत जिंग्या तिला मदत करीत असतो. मात्र कथेच्या शेवटी हा जिंग्या दुसरा-तिसरा कोणीही नसून तिचे वडीलच असल्याचे समजते. अतिशय भावनिकतेवर आधारित असलेल्या या नाटकात नात्यातील गुंफण सुरेख पद्धतीने मांडण्यात कलाकारांना यश आले. केदार रत्नपारखी, अपूर्वा सबनीस, गोल्डी ओतूरकर यांनी केलेल्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी जयेश आपटे (नेपथ्य), केदार-आनंद (संगीत), प्रबोध हिंगणे (प्रकाशयोजना), ज्ञानेश्वर काथवटे (वेशभूषा), माणिक नाना कानडे (रंगभूषा), अपूर्वा सबनीस (नृत्य दिग्दर्शन), तर प्रसाद, प्रशांत, नीलेश, संजीवनी, स्वराली, देवयानी, प्रपंचा, नक्षत्रा, गौरी, श्वेता, कल्याणी यांनी नृत्य कलाकार म्हणून जबाबदारी पार पाडली. (प्रतिनिधी)
कामगार नाट्य महोत्सव : सिडकोच्या ललित कला भवनची प्रस्तुती
By admin | Published: January 15, 2015 12:16 AM