गंगापूर : गंगापूररोड व आनंदवली भागातील बंगल्यांमध्ये धुणेभांडी घरकाम, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आनंदवली, बजरंगनगर व शिवनगर भागातील नागरिकांचे महापुरामुळे जगणे मुश्कील करून टाकले. त्यांच्या घरांची पडझड झाली, पत्रे उडाले, घरांतील संसार गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला.आनंदवली, शिवनगर, बजरंगनगर परिसरातील नागरिकांचे महापुरात मोठे नुकसान झाले. रात्रीच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातील पाणी जसजसे वाढू लागले तसतसे गंगापूर, आनंदवली भागातील शिवनगर, बजरंगनगर भागातील नागरिकांची तारांबळ उडाली.अचानकपणे पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने नागरिकांना आपले साहित्य वाहून नेण्यासाठीही वेळ मिळाला नसल्याने या भागातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेला. घरातील प्रत्येक वस्तू गोदेच्या पुरात वाहून गेली. पायाच्या गुडघ्यापर्यंत पाणी आल्यानंतर असे वाटले की कमी होईल म्हणून आम्ही कोणीच जास्त काळजी घेतली नाही, पण नंतर पाणी पंधरा मिनिटात वाढून कमरेपर्यंत पोहोचले आणि लेकराबाळांचा आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आम्हाला काहीच वाचवायला वेळच मिळाला नाही. आनंदवलीमधील बजरंगनगर, शिवनगरची अवस्था अशी बिकट होती. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या शाळेत हलवण्यात आले. तिथे त्यांची राहण्याची आणि दोन वेळच्या खिचडीची व्यवस्था करण्यात आली. पण प्रशासनाचे लोक आमच्या घराचे नुकसान बघायलादेखील फिरकले नसल्याची व्यथा येथील रहिवाशांनी मांडली. आनंदवली व चांदशी गावाला जोडणाऱ्या महापालिकेने बांधलेल्या नवीन पुलापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने मोठा परिसर महापुराच्या पाण्याखाली गेला होता. साधारण १२० घरांचे नुकसान झाल्याचे समजते. शासनाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला १० किलो तांदूळ, १० किलो गहू मोफत वाटण्याचे काम सध्या सुरू आहे.घराच्या पत्रांच्या वरपर्यंत पाणी गेले होते. सर्व भिंती भिजून आता त्या ओल्या झाल्याने कधी पडतील सांगत येत नाही, आम्ही आमचा जीव धोक्यात घेऊन राहत आहोत. घरातील सर्व वस्तू वाहून गेल्याने आमचे खूप नुकसान झाले आहे.- सरूबाई साबळे, बजरंगनगर, आनंदवलीदुकानातील किराणा सामान आणि घरातील फ्रीज, टीव्ही आणि अन्य सर्व वस्तू वाहून गेल्या. हजारो रु पयांचे नुकसान झाले आहे, मात्र अजून कोणतीही मदत मिळाली नाही.- कमळाबाई सांगळे, बजरंगनगरगोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी संपूर्ण घरात शिरले होते. घरातील जितक्या वस्तू हाती लागल्या तितक्या घेतल्या, लहान मुलांना कवटाळून महापालिकेच्या शाळेजवळच जाऊन आसरा घेतला. घराच्या भिंतींसह धान्य, कपडे, कपाट सगळं वाहून गेलं.- सरला महाजन, बजरंगनगरमहापुरामुळे आमच्या घरात पाणी शिरले. लाकडाचे कपाट, सर्व मौल्यवान वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आता सरकार काय मदत देते त्यांच्या आशेवर बसलोय. सरकारने लवकरात लवकर मदत करून गरिबांचे कल्याण करावे हीच इच्छा आहे.- इंदुबाई दराडे, शिवनगर, आनंदवलीनदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने लाकडी फळ्यांवर असलेली भांडी पुन्हा हाती लागली नाही. गॅस शेगडी सिलिंडर पोरांनी बाहेर घेऊन पळ काढल्याने पुन्हा चूल मांडली.- संजय धुमाळ, आनंदवलीरविवारी सकाळी आलेल्या पुराचे पाणी आमच्या घरात शिरल्याने सर्व संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. घराचे पत्रे वाहून गेले, भिंती पडल्या, आम्ही कसाबसा जीव वाचवत सगळे साहित्य सोडून पळालो. मात्र सगळीकडे पाणीच पाणी होते.- ज्योती सांगळे, बजरंगनगर, रहिवासी
महापुरात वाहून गेला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 1:02 AM