नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या विशाखा काव्य आणि बाबूराव बागुल कथा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नवोदित साहित्यिकांच्या विश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी मंगळवारी (दि. २७) केली.कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘विशाखा’ काव्यसंग्रहाच्या नावाने प्रथम कवितासंग्रहास ‘विशाखा काव्य पुरस्कार’, तर प्रख्यात कथालेखक बाबूराव बागुल यांच्या नावाने प्रथम कथासंग्रहासाठी ‘बाबूराव बागुल कथा पुरस्कार’ हे दोन्ही पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सन्मानपूर्वक दिले जातात. यंदाचा विशाखा काव्य प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील आंबुलगा येथील कवी अमृत तेलंग यांच्या ‘पुन्हा फुटतो भादवा’ या काव्यसंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. रोख २१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार ‘मरी मरी जाय सरीर’ या सांगली येथील कवयित्री योजना यादव यांच्या कवितासंग्रहाला जाहीर झाला असून, १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तृतीय क्र मांकाचा विशाखा काव्य पुरस्कार नाशिकस्थित कवी महेश दत्तात्रेय लोंढे यांच्या ‘निद्रानाशाची रोजनिशी’ या कवितासंग्रहाला घोषित झाला आहे. १० हजार रु पये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे २०१७ आणि २०१८ या दोन्ही वर्षांचे ‘बाबूराव बागुल कथा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. त्यात गोव्यातील धारगळ पेडणे येथील दयाराम पाडलोस्कर यांच्या ‘खपली निघाल्या नंतर’ या कथासंग्रहाला २०१७ चा, तर गडचिरोली येथील प्रमोद नामदेवराव बोरसरे यांच्या ‘पारवा’ या कथासंग्रहास २०१८ या वर्षाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लवकरच पुरस्कारांचे वितरणच्विशाखा काव्य पुरस्कारासाठी कौतिकराव ठाले-पाटील (औरंगाबाद), वि. दा. पिंगळे (पुणे), चंद्रशेखर गोखले (मुंबई) व प्रफुल्ल शिलेदार (नागपूर) यांनी, तर बाबूराव बागुल कथा पुरस्कारासाठी डॉ. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) व डॉ. शिरीश लांडगे (श्रीरामपूर) यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या प्रमुख प्रा. डॉ. विजया पाटील यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे काव्य, कथा पुरस्कार घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:55 AM