यशवंतराव प्रतिष्ठानचा दोन लाखांचा पुरस्कार लोकहितवादी मंडळास प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:02 AM2020-11-26T01:02:23+5:302020-11-26T01:02:46+5:30
नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दोन लाखांचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ शास्रज्ञ अनिल काकोडकर, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दोन लाखांचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ शास्रज्ञ अनिल काकोडकर, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहामध्ये झालेल्या या सोहळ्यात लोकहितवादी मंडळाच्या वतीने अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रांतील लक्षणीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. हे पारितोषिक कृषी, औद्योगिक, समाजरचना किंवा व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास आर्थिक -सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती कला, क्रीडा या क्षेत्रातील भरीव व पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्तीस अगर संस्थेस देण्यात येते. महाराष्ट्रात साहित्य, संस्कृती व कला क्षेत्रातील रचनात्मक, प्रेरक आणि भरीव योगदानासाठी लोकहितवादी मंडळ ही एक नामवंत संस्था आहे. कवी, कुलगुरु कुसुमाग्रज यांनी सन १९५० मध्ये लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. मंडळाने मराठी साहित्य, भाषा, सर्व कला क्षेत्रात नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. त्याची दखल घेत नाशिकच्या या संस्थेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, खासदार सुप्रिया सुळे आणि कोषाध्यक्ष हेमंत टकले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.