नाशिक : पावसाचा हंगामाचा तीसरा महिना सुरू आहे, मात्र अजुनही एप्रिलपासून सुरू झालेले पाण्याचे टँकर जिल्ह्यात थांबलेले नाही. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी सर्वाधिक येवलामध्ये २९ गावे व १५ वाडीस्ती तर चांदवड, मालेगाव या दोन तालुक्यांत अनुक्रमे १६ व १० गावे व १४ वाडीवस्तींवर पाणीटंचाई कायम आहे. सात तालुक्यांतील ६७ गावांसह ३९ वाड्यांची तहान ५६टँकरद्वारे आजही जिल्हा प्रशासनाकडून भागविली जात आहे.
नाशिक जिल्हा हा तसा बागायती पीकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील पर्जन्यमानाचे प्रमाण फारसे अत्यल्प असे नाही; मात्र यावर्षी पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा हे तालुके सोडले तर अन्य तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे अन्य तालुक्यांमधील शेतकरी व नागरिक हवालदिल आहे. सिन्नर, नांदगाव, चांदवड, येवला या तालुक्यांमध्ये अजुनही मुसळधार पाऊस झालेला नाही. या तालुक्यांमधील गावांमधील रस्त्यांवर चक्क ऑगस्टमध्येही पिण्याच्या पाण्याचे टँकर धावत आहेत. यावरून या भागातील पाणीटंचाईची झळ लक्षात येते.
मालेगावमध्ये सर्वाधिक एकुण ११विहिरींचे अधिग्रहण शासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण ३८विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी २५गावांसांठी तर १३ टँकरसाठी आहेत. ५६ टँकर १२३ फेऱ्या करत १ लाख ३१ हजार ५२९ नागरिकांची तहान भागवत आहेत.
जिल्ह्याला सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमधील लोकांचे डोळे आभाळाकडे लागले आहे.
हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यात पुढील आठवडाभर मध्यमत किंवा जोरदार पावसाचा इशारा दिलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र राहत आहे. तसेच सुर्यप्रकाशही पडू लागला आहे. यामुळे पावसाने पुर्णपणे विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.
तालुका--- टँकर - फेऱ्या
येवला----- १६- --४८मालेगाव---१३---१६
चांदवड---१०---३४बागलाण---३----११
देवळा----४-----२नांदगाव----८----९
सिन्नर----२-----३