जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर व बिकानेरमधील रुग्णालयांमध्ये डिसेंबर महिन्यात ३०८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कोटा येथील शासकीय रुग्णालयात अर्भकांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे राज्यात असंतोष वाढत असतानाच त्या राज्यातील अन्य ठिकाणचीही विदारक स्थिती उजेडात आली आहे.बुंदी येथील एका रुग्णालयातही डिसेंबर महिन्यात १० अर्भकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जोधपूर व बिकानेरमध्येही अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याने विरोधकांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली आहे. जोधपूरमधील उमेद व एमडीएम रुग्णालयामध्ये डिसेंबर महिन्यात १४६ अर्भके मरण पावली. त्यातील १०२ नवजात बालकांचा अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एस. एन. मेडिकल कॉलेजने तयार केलेल्या एका अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात या मेडिकल कॉलेजचे प्राचार्य एस. एन. राठोड यांनी सांगितले की, २०१९ यावर्षी या दोन्ही रुग्णालयांत दाखल झालेल्या ४७,८१५ अर्भकांपैकी ७५४ जण दगावले. याच रुग्णालयांत डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या ४,६८९ मुलांपैकी १४६ जण मरण पावले होते. त्यातील बहुतांश अर्भकांची प्रकृती चिंताजनक झाल्याने जोधपूर जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमधून त्यांना उमेद व एमडीएम रुग्णालयांत हलविण्यात आले होते. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पश्चिम राजस्थानमधील रुग्णालयांवर मोठा भार पडत आहे. जोधपूरमधील दोन्ही रुग्णालयांमध्ये अपुऱ्या वैद्यकीय सेवा असल्याच्या आरोपाचा राठोड यांनी इन्कार केला. बिकानेरमधील सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय महाविद्यालयाच्या पीबीएम रुग्णालयामध्ये डिसेंबर महिन्यात १६२ अर्भकांचा अतिदक्षता कक्षामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य एच. सी. कुमार यांनी सांगितले की, या रुग्णालयांत अर्भकांवर योग्य उपचार करण्यात येतात. त्याबाबतकोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. (वृत्तसंस्था)>कोटातील रुग्णालयाची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणीकोटा येथील जे. के. लोन रुग्णालयात गेल्या महिनाभरात दगावलेल्या अर्भकांची संख्या आता ११० झाली आहे. शनिवारी हा आकडा १०७ होता. मात्र, रविवारी आणखी तीन अर्भक दगावले.राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी लोन रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. पायलट यांनी सांगितले की, अर्भकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्यांच्यावर नीट उपचार व्हावेत यासाठी सर्वांनीच दक्ष राहायला हवे होते.>राजकोटमध्ये १११ नवजात बालकांचा मृत्यूगुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील सामान्य इस्पितळात डिसेंबर महिन्यात १११ नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद सामान्य रुग्णालयातही मागच्या महिन्यात ८८ नवजात बाळांचा मृत्यू झाला.गुजरातमधील सामान्य रुग्णालयात डिसेंबरमध्ये शंभराहून अधिक नवजात बाळांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताबाबत पत्रकारांनी वडोदरा येथे मुख्यमंत्री विजय रूपानी यांना विचारले असता उत्तर न देता ते निघून गेले.
जोधपूर, बिकानेरमध्ये महिन्यात ३०८ अर्भकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 4:42 AM