आयआयएस बंगळुरुत हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट; एका शास्त्रज्ञाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 07:50 PM2018-12-05T19:50:21+5:302018-12-05T19:51:48+5:30
स्फोटात तीन शास्त्रज्ञ गंभीर जखमी
बंगळुरु: कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एका शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. दुपारच्या सुमारास एका हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट झाला. सध्या बंगळुरु पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
हायड्रोजनच्या सिलिंडरच्या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, एका शास्त्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला. मनोज कुमार असं मृत्यूमुखी पडलेल्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. या स्फोटात तीन संशोधक गंभीर झाले. अतुल्य, कार्तिक आणि नरेश कुमार अशी जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हे चौघेही जण सुपरवेव टेक्नॉलजी नावाच्या स्टार्ट अपमध्ये काम करत होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एरोस्पेस लॅबमध्ये हा स्फोट झाला. 'घटनास्थळी गॅस किंवा आगीची कोणतीही माहिती मिळाली नाही,' असं लॅबच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हायड्रोजन सिलिंडरचा स्फोट होताच मनोज लॅबच्या भिंतीकडे फेकले गेले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या ऐरोस्पेस इंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक के. पी. जे. रेड्डी आणि जी. जगदीश हे स्टार्ट अप चालवत होते. हे दोन्ही प्राध्यापक शॉकवेव टेक्नॉलजीमध्ये निष्णात आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सदाशिवनगर पोलिसांकडून सुरू आहे.