आसाममध्ये ९ जिल्ह्यांत १ लाख ८९ हजार लोकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:30 AM2020-06-27T03:30:36+5:302020-06-27T03:31:04+5:30
लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यातील नऊ जिल्ह्यांत पूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गुरुवारी आणखी एक जण मरण पावला, तर सुमारे १ लाख ८९ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.
धेमाजी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे या नैसर्गिक संकटात आजवर मरण पावलेल्यांची संख्या १५ झाली आहे. आसाममध्ये येत्या पाच दिवसांत संततधार कोसळतच राहील. ईशान्य भारतातील सातही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, गोलाघाट, जोरहाट, मजुली, शिवसागर, दिब्रुगढ, तीनसुकिया जिल्ह्यांतील ४९२ गावांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. पुरामुळे मोठे नुकसान झालेल्या धेमाजी, मजुली, शिवसागर, तीनसुकिया जिल्ह्यांतील साडेअकरा हजार नागरिकांनी ४९ निवारा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. पुरामुळे १९,४३० हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. लखीमपूरसह काही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीने नेमातीघाट, धुब्री, तेजपूर येथे तर दिसांग, धनसिरी, जिया भारली या उपनद्यांनी शिवसागर, गोलाघाट, सोनीतपूर या ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिब्रुगढ शहराला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. प्रचंड पाऊस पडल्याने तेथे सर्वत्र पाणी साचले आहे. दिब्रुगढमधील दहा वॉर्डांमध्ये पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा
आसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी राज्यात मुसळधार पावसामुळे उद््भवलेल्या परिस्थितीचा गुरुवारी सायंकाळी आढावा घेतला. पुराचा तडाखा बसलेल्या भागांची माहिती जाणून घेण्यासाठी सोनोवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश सोनोवाल यांनी या बैठकीत दिले आहेत.
———————
>दोन आठवड्यांपूर्वीच मान्सून देशभरात
नवी दिल्ली : नैर्ऋत्य मान्सून नियोजित अवधीपूर्वीच देशभर व्यापला आहे. १ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पश्चिम राजस्थानमधील श्रीगंगानगर या शेवटच्या ठिकाणी मान्सून पोहोचण्यासाठी तब्बल ४५ दिवस लागतात. यावर्षी मात्र वेगाने आगेकूच करीत मान्सून देशभर सर्वत्र पोहोचला, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले.नैर्ऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या अन्य भागांत पोहोचला आहे.
असून, मान्सून २६ जून रोजी देशभर व्यापला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सूनने वायव्येकडे कूच केली आहे. मध्य भारतातील चक्रीवादळाच्या संचारामुळे मान्सूनला आगेकूच करण्यास मदत मिळाली. ८ जुलै रोजी मान्सून देशभर व्यापेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
२०१३ मध्ये मान्सून १६ जून रोजी देशभर व्यापला होता. त्यावेळी उत्तराखंडमध्ये मोठा पूर आला होता. यावर्षी मान्सून वेगाने आगेकूच करून देशभर व्यापला आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
पुढील तीन दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राजस्थानमध्ये सर्वत्र पाऊस...
नैर्ऋत्य मान्सून राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांत पोहोचला असून, विविध ठिकाणी पाऊस झाला. जयपूर येथील हवामान केंद्राचे संचालक शिव गणेश यांनी सांगितले की, अंदाजापेक्षा एक दिवस आधीच २४ जून रोजीच मान्सूनचे राजस्थानात आगमन झाले. राज्यातील सर्व ३३ जिल्ह्यांत विविध ठिकाणी पाऊस झाला.
—————————