तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर १० कोटी रुपयांच्या नोटा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 04:41 AM2018-10-21T04:41:58+5:302018-10-21T05:01:18+5:30
लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, या काळात बराच काळा पैसा बाहेर निघण्यास सुरुवात होते.
हैदराबाद : लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, या काळात बराच काळा पैसा बाहेर निघण्यास सुरुवात होते. हा पैसा कोठून येतो, कोणाकोणाला आणि कशा पद्धतीने दिला जातो, याच्या बातम्या येत असतात. आताही तेलंगणात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तब्बल १0 कोटी रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
ही सारी रक्कम बेहिशेबी आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील पिप्परवाडा टोलनाक्याजवळ कार अडवून तिची तपासणी केली असता, त्यात १0 कोटी रुपये आढळले, अशी माहिती आदिलाबादचे पोलीस अधीक्षक नरसिंह रेड्डी यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहने तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ही कार टोलनाक्याजवळ अडवली असता आतमध्ये पाच बॅगा दिसून आल्या. त्या उघडल्या, तेव्हा त्यात ५00 आणि २000 रुपयांच्या नोटा असल्याचे दिसून आले. या सर्व नोटा कोठून आल्या, कोणी दिल्या, त्याची काही कागदपत्रे आहेत का, असे प्रश्न पोलिसांनी कारमध्ये बसलेल्या दोन जणांना केले; पण त्यांना त्याची समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
Telangana police seized unaccounted cash worth Rs 10 crore from a car caught at a check post near Pipparwada toll plaza y'day while police was conducting checking for the forthcoming polls to implement model code of conduct. Case registered, 2 persons arrested. Further probe on.
— ANI (@ANI) October 20, 2018
>कारमधील दोघेही नागपूरचे
आम्ही व्यापारी आहोत आणि आम्ही कर्नाटकातील एका गावी निघालो आहोत, असे उत्तर कारमधील दोघांनी दिले. आपण नागपूरमधील असल्याचेही दोघांनी पोलिसांना सांगितले. या प्रकाराची माहिती पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला दिली.