विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये ११ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. डीसीपी सुरेश बाबू क्रेन कोसळून दुर्घटना घडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. हिंदुस्तान शिपयार्डमधील मोठी क्रेन कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दुर्घटनेवेळी जवळपास १८ मजकूर क्रेनवर काम करत होते. मंत्री अवंती श्रीनिवास यांनी घटनेची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्रेनमधून लोडिंग सुरू असताना दुर्घटना घडली. क्रेन खाली दबलेल्या दोन मजुरांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंनी ट्विट करून दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'हिंदुस्तान शिपयार्डमधील मोठी क्रेन कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समजलं. त्यावेळी तिथे ३० जण उपस्थित असल्याचं समजतं. ते सर्व सुरक्षित असावी, अशी मी प्रार्थना करतो,' असं नायडूंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.