बिनधास्त वापरा 10 रूपयांचं नाणं, आरबीआयचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 05:40 PM2018-01-17T17:40:54+5:302018-01-17T17:45:06+5:30
10 रूपयांच्या नाण्याचे सर्व 14 डिझाइन वैध आहेत,तुमच्याकडे असलेलं 10 रूपयांचं नाणं पूर्णपणे वैध असून व्यवहारामध्ये ते नाणं स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही.
नवी दिल्ली: तुमच्याकडे असलेलं 10 रूपयांचं नाणं पूर्णपणे वैध असून व्यवहारामध्ये ते नाणं स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. 10 रूपयांच्या नाण्याचे सर्व 14 डिझाइन वैध आहेत असं भारतीय रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केलं आहे. दहा रूपयांच्या नाण्याबाबत सुरू असलेल्या अफवांनंतर आरबीआयने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
सामान्य माणूस आणि व्यापारी वर्गामध्ये 10 रूपयांच्या नाण्याबाबत विविध शंका आहेत. दहा रूपयांची नाणी वैध नाहीत अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण दहा रूपयांची सर्व नाणी वैध असून कोणीही ती स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. बाजारात 10 रूपयांची 14 प्रकारची नाणी उपलब्ध आहेत. वेळोवेळी ही नाणी आरबीआयकडून जारी करण्यात आली आहेत. या नाण्यांद्वारे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचं दर्शन होतं. यामुळेच बाजारात वेगवेगळ्या प्रकारची 10 रूपयांची नाणी पाहायला मिळतात. पण या नाण्यांबाबत कोणाच्याही मनात काही शंका नसावी, हे पूर्णपणे वैध आहे असं आरबीआयने म्हटलं आहे.
तसंच आरबीआयने देशातील सर्व बॅंकांना 10 रूपयांच्या नाण्याबाबत निर्देश दिले आहेत. जनतेला 10 रूपयांच्या नाण्याबाबत विश्वास द्यावा आणि कोणत्याही भीतीविना 10 रूपयांच्या नाण्याचा व्यवहार करण्यास सांगावं असे निर्देश सर्व बॅंकांना दिले आहेत. याशिवाय बॅंकांनी आपल्या शाखांमध्ये या नाण्यांची देवाण-घेवाण सुरू ठेवावी असं सांगितलं आहे.