अहमदाबाद : अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. रथयात्रेदरम्यान घराची बाल्कनी कोसळल्याने अनेक जण जखमी झाले असून घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. इमारतीच्या बाल्कनीत उभे राहून रथयात्रा पाहत होते. दरम्यान, अचानक तिसऱ्या मजल्यावरची बाल्कनी खाली पडली अन् मोठा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बाल्कनीत लहान मुले आणि महिलाही उभ्या होत्या.
अचानक झालेल्या अपघातामुळे सर्वजण ढिगाऱ्यासह खाली पडले. याशिवाय इमारतीचा ढिगारा खाली उभ्या असलेल्या लोकांवर पडला, त्यामुळे लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात १० ते १५ जण जखमी झाल्याचे समजते. अहमदाबादमधील दरियापूर काडिया नाक्याजवळ एका बाल्कनीचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना स्थानिकांनी जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.
जखमींमध्ये २ लहानग्यांचा समावेश तिसऱ्या मजल्यावरची बाल्कनी पडल्याने खालच्या मजल्यावरून रथयात्रा पाहणाऱ्या लोकांनाही दुखापत झाली. काही किलोमीटर अंतरानंतर यात्रा संपणार असतानाच ही दुर्घटना घडली. माहितीनुसार, जखमींमध्ये २ मुले, ३ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.