लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील २० प्रमुख अर्थव्यवस्थांचा समूह असलेल्या जी-२० चे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. ही जी-२० परिषद संस्मरणीय करण्यासाठी केंद्र सरकार दोन प्रकारची विशेष स्मारक नाणीही जारी करणार आहे. पहिले नाणे १०० रुपयांचे आणि दुसरे नाणे ७५ रुपयांचे असेल.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताने औपचारिकपणे जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर पहिली वित्त आणि केंद्रीय बँक प्रतिनिधींची बैठक, जी-२० विकास गटाची पहिली बैठक आणि संयुक्त वित्त आणि आरोग्य टास्क फोर्सची बैठक भारताच्या विविध शहरांमध्ये झाली आहे. भारत १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जी-२० चे अध्यक्षपद भूषवित आहे. या अंतर्गत भारतातील ६० हून अधिक शहरांमध्ये २०० हून अधिक बैठका आयोजित केल्या जातील. जागतिक समूहाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी आपल्या देशाला मिळाली, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.
सुधीर लुणावत यांनी सांगितले की, यापूर्वी जी- २० संमेलनानिमित्त २०१० मध्ये कोरिया, २०११ मध्ये फ्रान्स, २०१६ मध्ये चीन, २०२० मध्ये इटली यांनी स्मारक नाणी जारी केलेली आहेत. तर, २०२० मध्ये सौदी अरेबियाने जी- २० संमेलनानिमित्त रियाल नोट जारी केली होती.
अशी असतील नाणीn नाणी आणि चलनी नोटांचे संकलन आणि अभ्यास करणारे प्रसिद्ध मुद्राशास्त्रज्ञ सुधीर लुणावत यांच्या मते या दोन्ही नाण्यांच्या मुख्य भागाची रचना सारखीच असेल. n या नाण्यावर जी-२० चा अधिकृत लोगो कोरलेला असेल. त्याच्यावर हिंदीत आणि खाली इंग्रजीत भारताचे जी-२० चे अध्यक्षपद लिहिलेले असेल. n ही दोन्ही नाणी बाजारात कधीही चलनात येणार नाहीत आणि ही दोन्ही नाणी कोलकाता येथील भारत सरकारच्या टांकसाळीत तयार केली जातील.