नवी दिल्ली, दि. 3 - देशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या पुलांकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचंही ते बोलले आहेत. लोकसभेत बोलत असताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
आपल्या मंत्रालयाने देशभरातील 1.6 लाख पुलांचं सेफ्टी ऑडिट केलं असून, 100 हून अधिक बांधकामं जीर्ण मोडकळीच्या अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. हे 100 पूल कधीही कोसळण्याची भीती असून, त्यांच्याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे असं गडकरी बोलले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना त्यांनी ही माहिती उघड केली.
यावेळी नितीन गडकरी यांनी सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेचा उल्लेख केला. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेला बुधवारी एक वर्ष पूर्ण झालं. गतवर्षी २ ऑगस्टला महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता. त्यात दोन एसटी बस आणि एक टव्हेरा गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. यात ४२ जणांचा मृत्यू झाला होता.
'यापुढे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी माझ्या मंत्रालयाने सर्व पुलांची माहिती घेण्यासाठी विशेष प्रोजक्ट लाँच केला होता', अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. रस्ते प्रकल्पाच्या कामांमध्ये होत असलेला उशीर यावर बोलताना गडकरींनी हा उशीर जमीन अधीग्रहण, पर्यावरण मंजुरींमुळे होत असल्याचं सांगितलं.
सावित्री पूल पाच महिन्यात पुन्हा उभा राहिलासावित्री पूल दुर्घटनेची दखल घेऊन भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याच ठिकाणी सहा महिन्यांत नवीन पूल बांधण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे पुलाचे काम पाच महिन्यांमध्येच पुर्ण करण्यात आले. तीन पदरी आणि 239 मीटर लांबीच्या या पुलाचं नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
हा पूल बारा गाळ्यांचा, तीन पदरी आणि पदपथासह सोळा मीटर रुंदीचा आहे. साधारणत: या मोजमापाचा पूल पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र या पुलाचे महत्त्व विचारात घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १८० दिवसांत पूल उभा करण्यात येईल असे जाहीर केले होते. निविदेमध्येही तशी अट टाकण्यात आली होती. एल अँड टी या ठेकेदार कंपनीने हे आव्हान स्वीकारत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम करून पाच महिन्यांमध्येच हे काम पूर्ण केले. या पुलाच्या बांधकामासाठी 35.77 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.