चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये आजपासून 100 टक्के प्रेक्षक, केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:53 AM2021-02-01T04:53:11+5:302021-02-01T07:38:25+5:30
कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने नुकतीच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार चित्रपट व नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली. याआधी फक्त ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती.
नवी दिल्ली : देशभरातील चित्रपट, नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास केंद्र सरकारने उद्या, १ फेब्रुवारीपासून परवानगी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात चित्रपट, नाट्यगृहांचे उत्पन्न खालावले होते ते वाढण्यास या निर्णयामुळे आता मोठी मदत होणार आहे.
कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने नुकतीच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार चित्रपट व नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली. याआधी फक्त ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती.
चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांनी फिजिकल डिस्टन्सिंग राखावे तसेच तोंडावर मास्क लावावे, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर देशभरातील हजारो चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद झाली. त्यामुळे चित्रपटांचा व नाटकांचाही व्यवसाय खूपच मंदावला होता. ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र, सभागृह क्षमतेच्या फक्त ५० टक्के लोकांनाच प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली होती.
ऑनलाइन तिकीट बुकिंगवर भर
कोरोना साथीच्या फैलावाचे प्रमाणही देशात बरेच कमी झाले आहे. चित्रपट व नाट्यगृहे पूर्वीसारखी चालावीत म्हणून त्यांच्या संचालकांनीही चित्रपट, नाटकाचे खेळ कमी केले आहेत. प्रेक्षकांना सर्व नियम पाळण्यास सांगितले जाते व तिकीट बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला.
दुसऱ्या टप्प्याची पूर्वतयारी सुरू
दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षे वयावरील तसेच ५० वर्षे वयाखालील असलेल्या व ज्यांना एकाहून अधिक व्याधींचा त्रास आहे अशा लोकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. या टप्प्याचीही पूर्वतयारी केंद्राने सुरू केली आहे. लसीकरण मोहिमेसाठी कोविन हे अॅप वापरण्यात येत आहे. इच्छुकांनी नावाची नोंदणी कोविन अॅपवर करायची आहे.
देशातील कोरोना योद्ध्यांचे आजपासून होणार लसीकरण
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत आरोग्य सेवकांबरोबर आता उद्या, १ फेब्रुवारीपासून कोरोना योद्ध्यांनाही ही लस देण्यात येणार आहे. कोरोना योद्ध्यांमध्ये स्वच्छता कर्मचारी, पोलीस, निमलष्करी दलाचे जवान, होमगार्ड, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात काम करणारे कर्मचारी व नागरी संरक्षण दलांतील जवान यांचा समावेश आहे.
स्वच्छता कर्मचारी, पोलीस, निमलष्करी जवान आदींचा समावेश
भारत ६० देशांना पुरवणार लसीचे १६ कोटी डोस
नवी दिल्ली : सुमारे ६० देश व युनिसेफला भारतात बनलेल्या दोन कोरोना प्रतिबंधक लसींच्या १६ कोटींहून अधिक डोसचा पुरवठा करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. कोरोना काळात भारत हा जगासाठी लस व औषधांचे मुख्य पुरवठा केंद्र बनला आहे.
बळींच्या संख्येत लक्षणीय घट
देशभरात कोरोनामुळे दररोज नोंंदल्या जाणाऱ्या बळींच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून, रविवारी १२७ जणांचा मृत्यू झाला. तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.९९ टक्के झाले.