Burari Case : 11 मृतदेह अन् 'ते' 11 पाईप; बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरणाचं गूढ वाढलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:02 PM2018-07-02T13:02:26+5:302018-07-02T13:04:29+5:30
11 पाईप्सपैकी 7 सरळ आणि 4 वळलेल्या स्थितीत
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील बुरारी भागातील संतनगरमधील एका घरात 11 मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. एकाच घरातील 11 जणांच्या आत्महत्येची देशभरात चर्चा आहे. या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यामधून अनेक रहस्यमय बाबी समोर आल्या आहेत. या कुटुंबानं पूर्ण तयारीनिशी आत्महत्या केल्याचं तपासादरम्यान हाती लागलेल्या पुराव्यांवरुन स्पष्ट झालं आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यानं हा प्रकार घडला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
11 मृतदेह आढळून आलेल्या घरात सापडलेल्या रजिस्टरमधील मजकुरातून या संपूर्ण प्रकरणामागे अंधश्रद्धा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पोलिसांना घरात 11 पाईप आढळून आले आहेत. घराच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला अतिशय कमी भागात 11 पाईप अगदी आसपास लावण्यात आले आहेत. यातील 7 पाईप सरळ आणि 4 वळलेले आहेत. मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश असल्यानं याबद्दलचं गूढ वाढलं आहे. या पाईप्समधून पाणी बाहेर पडल्याच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे हे 11 पाईप नेमके कशासाठी लावण्यात आले होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
दिल्लीतील बुरारीमधील ज्या घरात 11 जणांचे मृतदेह आढळले, त्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमधील माहिती अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांना तपासादरम्यान घरात दोन रजिस्टर आढळून आले आहेत. यामध्ये जो मजकूर आहे, अगदी त्याचप्रकारे घरातील एका खोलीत 10 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर अकरावा मृतदेह दुसऱ्या खोलीत सापडला. 'तुम्ही जर टेबलाचा वापर करुन डोळे बंद केलेत आणि हात बांधलेत, तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे अंधश्रद्धेतून या कुटुंबानं स्वत:चा अंत केला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही रजिस्टरमधील काही पानांमधील माहिती धक्कादायक आहे. कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकायला हवं, याचा तपशील रजिस्टरमध्ये आहे. कुटुंबातील कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकूवन जीव द्यावा, याची नोंद रजिस्टरमध्ये आहे. घरात आढळलेले मृतदेह अगदी रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीनुसार लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत.