- सुरेश एस. डुग्गर
जम्मू : काश्मीरमध्ये गेल्या दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकींमध्ये ४ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, दहशतवाद्यांमध्ये १४ वर्षांच्या मुलाचाही समावेश हाेता. गेल्या तीन दिवसांमध्ये एकूण १२ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला असून या वर्षी आतापर्यंत ४८ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार मारण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-ताेयबा आणि अल बदर या संघटनांचे सदस्य हाेते. शाेपियानच्या चित्रीगाम कलान परिसरात शनिवारपासून चकमक सुरू हाेती. त्या ठिकाणी लपून बसलेल्या दाेन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. गेल्या दाेन दिवसांमध्ये या ठिकाणी ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. तर अनंतनाग जिल्ह्यात बिजबहाडा क्षेत्रात सेमथान गावात लपलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाला ठार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. काश्मीरच्या खाेऱ्यांमध्ये सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या शाेधमाेहिमेदरम्यान तीन दिवसांमध्ये १२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सेमथान गावात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे.
१४ वर्षांचा फैसल झाला दहशतवादी ठार झालेल्या दहशतवाद्यांत १४ वर्षांचा फैसल गुलजार गनई याचाही समावेश आहे. हा मुलगा काही दिवसांपूर्वीच घरातून पळून दहशतवाद्यांमध्ये सामील झाला हाेता. कुटुंबीयांनी फैसलला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्याच्यासाेबत असलेल्या अल-बदरचा कमांडर आसिफ शेखने त्याला राेखले. त्यानंतरही त्याला संधी देण्यात आली हाेती. मात्र, त्यावेळी फैसलने नकार दिला.