लखनऊ, दि.8- आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमने गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ घातला आहे. या खेळाने उत्तर प्रदेशातील एकाचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका १३ वर्षांच्या एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या ब्लू व्हेल या गेममुळे केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आदित्य वर्धन असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. हा मुलगा लखनऊ येथील इंदिरा नगर भागात असलेल्या आदित्य निर्मला इंग्रजी शाळेत शिकत होता. आदित्य गेल्या दोन आठवड्यापासून ब्लू व्हेल गेम खेळत होता आणि तो काहीसा ताणातही होता, असं आदित्यच्या मित्रांनी सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलं.
उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या आठवडयात सर्व जिल्ह्यांच्या पोलिस मुख्यालयांना ब्लू व्हेल खेळावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. आदित्य हा अभ्यासात फारसा हुशार नव्हता. आदित्य बऱ्याचदा त्याच्या आईच्या मोबाइलवरच गेम खेळत असायचा अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. ‘ब्लू व्हेल’ या गेममुळेच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने आदित्यच्या आत्महत्येसंदर्भातील बातमी दिली आहे.
३ सप्टेंबर रोजी सात्विक पांडे या मुलाने ट्रेन खाली उडी मारून ब्लू व्हेल गेम मुळे आपले आयुष्य संपविल्याचा अंदाज व्यक्त होत होता. पाच दिवसातच ब्लू व्हेल गेममुळे दुसरी आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. तसंच मुंबईत मनप्रीत नावाच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर देशभरात या गेममुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या घटना वाढत गेल्या.
ब्लू व्हेलच्या नादात आत्महत्या करण्यापासून वाचवलेल्या जोधपूरमधील मुलीचा पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्नब्लू व्हेल गेमच्या नादात जोधपूरमधील मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे गेमच्या नादात पहिल्या वेळी आत्महत्या करण्यापासून त्या मुलीला वाचविण्यात आलं होतं. पण या मुलीने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्या खाऊन दहावीत शिकणाऱ्या या मुलीने दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ब्लू व्हेल गेमच्या शेवटच्या टास्कपर्यंत पोहचल्याने तिने सोमवारी रात्री पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मुलीने आधी तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता .पण त्यावेळी पोलिसांनी आणि काही लोकांनी तिला तलावाबाहेर खेचून वाचवलं. पण त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा तिने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला.