बुलंदशहर : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचारात गोळीबार करून पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमित या युवकाला ठार केल्याचा आरोप असलेला लष्करी जवान जितेंद्र मलिक याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.२२ राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत असलेला जितेंद्र ऊर्फ जितू फौजी याला काश्मीरमधील सोपोर येथून उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी अटक करून बुलंदशहर येथे आणले. जितेंद्रचा भाऊ धर्मेंद्र याने पत्रकारांना सांगितले की, कोणीतरी कट रचून माझ्या भावाला अडकविले आहे. त्याने सुबोधकुमार सिंह यांची हत्या केलेली नाही. हा प्रकार घडला त्यावेळी माझा भाऊ तिथे उपस्थित नव्हता, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आपण कोणालाही ठार केलेले नाही, असे या जवानाने पोलिसांना सांगितले आहे.बदल्यांबाबत सरकार काय म्हणते?वरिष्ठ पोलीस अधीक्षक कृष्णाबहादूर सिंह, सियाना भागाचे पोलीस अधिकारी सत्यप्रकाश शर्मा, चिंग्रावती पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी सुरेशकुमार या तिघांची बदली करण्यात आली होती; मात्र या नियमित स्वरूपाच्या बदल्या असून, त्याचा गोहत्येच्या कारणावरून बुलंदशहर जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही, असे सरकारच्या सूत्रांनी म्हटले आहे.
लष्करी जवानाला १४ दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 6:16 AM