पाटणा - भागलपूरमध्ये नुकत्याच झालेल्या जातीय संघर्षात असलेल्या कथित सहभागाबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांचा मुलगा अरिजित शाश्वत याला न्यायालयाने १४ दिवस कोठडी सुनावली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागलपूरच्या न्यायालयाने शाश्वत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला पहाटेच अटक झाली. २४ मार्च रोजी त्याच्यावर अटक वॉरंट बजावण्यात आले होते. पाटणा जंक्शन परिसरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शाश्वत असल्याची आम्हाला माहिती होती. त्याला अटक करून भागलपूरला पाठवण्यात आले, असे पाटणाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनु महाराज यांनी सांगितले. पोलिसांनी त्याला अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. आर. उपाध्याय यांच्या समोर हजर केल्यावर त्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, असे सरकारी वकील सत्य नारायण प्रसाद साह यांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून मी स्वत:ला पोलिासांच्या हवाली केले. मी अटक टाळत असल्याचा चुकीचा आरोप माझ्यावर झाला, असे शाश्वत चौबे याने वार्ताहरांशी बोलताना सांगितले. मी कोणताही गुन्हा केलेला नाही त्यामुळे मी काही फरार नव्हतो. ‘भारत माता’ आणि ‘श्री राम’ अशा घोषणा देणे जर गुन्हा असेल तर मला गुन्हेगार म्हटले जाऊ शकते, असे तो म्हणाला.चौबे याच्या नेतृत्वाखालील मिरवणुकीत मोठ्या आवाजातील संगीताला काही लोकांनी आक्षेप घेतल्यावर १७ मार्च रोजी झालेल्या जातीय हिंसाचारानंतर भागलपूरच्या नाथनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दोनपैकी एका प्रथम माहिती अहवालात शाश्वत चौबे व इतर आठ जणांची नावे आहेत. (वृत्तसंस्था)
केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला १४ दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:11 AM