देशभर आयएसशी संबंधित १५५ जणांना अटक -रेड्डी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 04:28 AM2019-06-26T04:28:17+5:302019-06-26T04:28:34+5:30
बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य आणि सहानुभूतीदार अशा १५५ जणांना देशभरात अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले.
नवी दिल्ली : बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य आणि सहानुभूतीदार अशा १५५ जणांना देशभरात अटक करण्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत सांगितले. वेगवेगळ्या राज्यांत काही लोक स्वतंत्रपणे आयएसला जाऊन मिळाल्याच्याही घटना केंद्रीय आणि राज्याच्या सुरक्षा संस्थांच्या निदर्शनास आल्या आहेत, असे मंत्रालयाने म्हटले.
एनआयए आणि राज्याचे पोलीस दल यांनी आयएसचे सहानुभूतीदार आणि सदस्यांवर गुन्हेही दाखल केले आहेत आणि संपूर्ण देशभरातून १५५ जणांना अटक केली, असे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड लेव्हँट, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया किंवा दाएश यांना त्या दहशतवादी संघटना असल्याचे अधिसूचित करण्यात येऊन बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या पहिल्या अनुसूचीनुसार केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे.
समाजमाध्यमांचा वापर
आयएस आपल्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी इंटरनेट आधारित वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा उपयोग करीत आहे. या पार्श्वभूमीवर या सुरक्षा संस्था सायबर स्पेसवर अतिशय कडक नजर ठेवून असतात व जी कारवाई केली गेली ती कायद्यानुसारच होती, असे रेड्डी म्हणाले.