लखनौ - उत्तर प्रदेशच्या काही भागांना बुधवारी रात्री वादळ व मुसळधार पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या १६ वर पोहोचली असून, २७ जण जखमी झाले आहेत. राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.इटावा येथे रात्री चार, मथुरा व अलिगढ येथे प्रत्येकी तीन, फिरोझाबाद व आग्रा येथे प्रत्येकी दोन तर हाथरस व कानपूर येथे प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. बुधवारच्या वादळतांडवात सात घरे कोसळली असून, ३७ गुरे मरण पावली आहेत. वादळ व पावसाचा तडाखा उत्तरप्रदेशातील नऊ जिल्ह्यांना बसला आहे. गेल्या आठवड्यातील वादळाचाही फटका याच जिल्ह्यांना बसला होता. धुळीचे वादळ व मुसळधार पावसामुळे पाच राज्यांत १३४ जणांचा बळी गेला व ४००हून अधिक जण जखमी झाले होते.या वादळात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई उत्तरप्रदेश सरकार देणार आहे. वादळामुळे नुकसान झालेल्या मथुरातील काही ठिकाणांना उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली.मुख्यमंत्र्यांचे आदेशशनिवारी व रविवारी उत्तरप्रदेशच्या पूर्व भागामध्ये ताशी ७० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.वादळग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याची गती वाढविण्याचे तसेच नुकसान झालेल्या भागांना मंत्री तसेच जिल्हाधिकाºयांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, असे आदेश योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिले आहेत.
उत्तरप्रदेशातील वादळात १६ बळी, २७ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:52 AM