खेळता खेळता १६ वर्षीय मुलीला हृदयविकाराचा झटका; दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 08:57 PM2023-01-26T20:57:37+5:302023-01-26T20:57:52+5:30
या विद्यार्थिनीचं नाव वृंदा त्रिपाठी असून तिला कोणताही गंभीर आजार नव्हता. ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती.
इंदूर - हृदयविकाराचा झटका आता किशोरवयीन मुलांचाही बळी घेत आहे. इंदूरमध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ती ११वीची विद्यार्थिनी होती. शाळेत मित्रांसोबत खेळत होती. एवढ्या लहान वयात या विद्यार्थिनीने जगाचा निरोप घेतला, मात्र दु:खाचा डोंगर उभा असूनही तिच्या कुटुंबीयांनी तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ती इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवू शकेल.
या विद्यार्थिनीचं नाव वृंदा त्रिपाठी असून तिला कोणताही गंभीर आजार नव्हता. ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र खेळताना अचानक तिच्या छातीत दुखू लागलं आणि चक्कर येऊन खाली कोसळली. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितले जात असले तरी विद्यार्थिनीचा मृतदेहही पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे, जेणेकरून मृत्यूचे खरे कारणही कळू शकेल.
कुटुंबाला बसला जबर धक्का
वृंदानं अचानक जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, मात्र दु:खाच्या परिस्थितीतही त्यांनी १६ वर्षांच्या मुलीचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुस्कान ग्रुपशी संपर्क साधला. स्वयंसेवक जीतू बागानी आणि अनिल गोरे यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. वृंदाचे डोळे इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ग्रुपचे सेवक राजेंद्र माखिजा, संदिपान आर्य, लकी खत्री यांनीही या कामात समन्वय साधला.
सतत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
इंदूरमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.