किश्तवार (जम्मू आणि काश्मीर) : चालकाचे नियंत्रण गमावलेली मिनी बस रस्त्यावरून घसरून ३०० फूट दरीत कोसळल्यामुळे किमान १७ जण ठार, तर १६ जण जखमी झाले.ही दुर्घटना किश्तवार जिल्ह्यात चिनाब नदीपात्राजवळ थकराईनजीक दनदारन येथे शुक्रवारी सकाळी घडली. बस केशवन भागातून किश्तवारकडे येत होती, असे जिल्हा विकास अधिकारी (किश्तवार) अंग्रेज सिंह राणा यांनी सांगितले. मृतांत तीन महिला व बसचालक अश्रफ हुसेन याचा समावेश आहे. हुसेन याला वाहतूक पोलिसांनी गुरुवारी ओव्हर लोडिंगबद्दल दंड ठोठावला होता.बहुतेक लोक जागीच ठार झाले. ११ गंभीर जखमींपैकी एकाला विमानाने जम्मूला हलवण्यात आले. तेथील सरकारी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. राणा यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये, तर प्रत्येक जखमीला ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केली. बचावकार्य खूप वेगाने केल्याबद्दल राणा यांनी लष्कर, पोलीस आणि स्थानिक रहिवाशांची प्रशंसा केली.महिनाभरातील तिसरा मोठा अपघातकिश्तवार जिल्ह्यात गेल्या महिनाभरातील हा तिसरा मोठा अपघात आहे. २१ आॅगस्ट रोजी मचैल यात्रेकरूंना घेऊन निघालेली कॅब दरीत कोसळून १३ जण, तर त्या आधीच्या दिवशी दोन वाहनांवर मोठा दगड कोसळून १२ जण ठार, तर सात जण जखमी झाले होते.
काश्मिरात बस दरीत कोसळून १७ ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:43 PM