१७ पर्यटनस्थळांमध्ये अजिंठा, वेरूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 05:27 AM2019-07-07T05:27:00+5:302019-07-07T05:27:05+5:30
अर्थमंत्र्यांची घोषणा। संपूर्ण परिसराचा होणार विकास
नवी दिल्ली : देशातील ज्या महत्त्वाच्या १७ पर्यटनस्थळांना विकसित करून, जागतिक दर्जा देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केली, त्यात महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांचा समावेश आहे. जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये टाकण्यासाठी त्यांचा व परिसराचा विकास केला जाणार आहे. या १७ स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात १,३७८ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याखेरीज कर्नाटकातील हम्पी, गोव्यातील कोळवा बीच, राजस्थानातील अजमेरचा किल्ला, बिहारमधील महाबोधी मंदिर यांचाही या १७ ठिकाणांमध्ये समावेश असणार आहे. पर्यटकांमध्येही आताही हीच पर्यटनस्थळे लोकप्रिय आहेत. देश-परदेशांतील पर्यटक यापैकी बहुसंख्य इथे हमखास जातात.
सोमनाथला भाविकांची अधिक गर्दी असते, तर काझीरंगामध्ये वन्यप्राणी पाहण्यासाठीही अनेक पर्यटक जातात. अधिकाधिक पर्यटकांनी जावे, यासाठी तिथे अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. हॉटेल्स, चांगल्या दर्जाची रेस्टॉरंट्स, विविध सरकारी व खासगी वाहने, मार्गदर्शक, रेल्वे व विमानतळांपासून चांगले रस्ते व वाहनव्यवस्था यांचा त्यात समावेश आहे.
मात्र, अनेकांना या पर्यटनस्थळांची माहिती नसल्याने पर्यटन मंडळातर्फे देश-विदेशांत ती देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक पर्यटनस्थळाची स्वतंत्र वेबसाइट असेल आणि त्यात तिथे पोहोचण्यापासून, राहणे व खाण्याची सर्व माहिती असेल. नेमण्यात येणाऱ्या मार्गदर्शकांची माहितीही त्यात दिली जाईल. परदेशांतील दूतावासांमध्येही या स्थळांची माहिती मिळू शकेल.
निर्मला सीतारामन यांनी १७ ठिकाणांचा उल्लेख केला होता, पण त्या ठिकाणांची नावे मात्र त्यांच्या भाषणात नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, या १७ ठिकाणांमध्ये आग्रा येथील ताजमहाल व फतेपूर सिक्रीचा किल्ला, दिल्लीतील कुतुबमिनार, हुमायूंची कबर, लाल किल्ला, गुजरातमधील सोमनाथ व ढोलवीरा, खजुराओ (मध्य प्रदेश), महाबलीपूरम (तामिळनाडू), कुमारकोम (केरळ), काझीरंगा (आसाम) यांचाही समावेश करण्यात आला आहे.
अजिंठा लेणी इ.स. पूर्व दुसरे ते इ. स. चौथे अशा कालखंडात तयार केल्या आहेत. त्यात एकूण २९ बौद्ध लेणी आहेत.
पाचव्या ते दहाव्या शतकात कोरलेल्या वेरूळ लेणी आहेत. कैलाश मंदिराची निर्मिती राष्ट्रकुट राजा कृष्ण याच्या काळात झाली.