मल्लपुरम :केरळमधील मल्लपुरम भागात असलेल्या दोन शाळांमधील तब्बल १९२ विद्यार्थी आणि ७२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. १० वी आणि १२ वी परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी तसेच प्रॅक्टिकल परीक्षांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. (192 students and 72 school staff corona positive in malappuram kerala)
मिळालेल्या माहितीनुसार, मारनचेरी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर शाळेतील शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. या शाळेतील एकूण ६३८ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी १४९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर, ५१ शालेय कर्मचाऱ्यांपैकी ३९ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
"मी नेहमीच गंगा आणि गंगेच्या उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या विरोधात होते"
मल्लपुरम भागातील दुसऱ्या एका शाळेतही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या शाळेत ४३ विद्यार्थी आणि ३३ शालेय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. हे सर्व विद्यार्थी १० वी इयत्तेचे आहेत. सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, १० वी आणि १२ वी परीक्षांच्या तयारीसाठी केरळमधील बहुतांश शाळा सुरू करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या शंका, उजळणी, नमुना चाचणी नियमितपणे घेतल्या जात आहेत. केवळ १० वी आणि १२ वीच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी संख्याही कमी आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसवले जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळांमध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे, ज्यांच्या पालकांचे अनुमती पत्र विद्यार्थ्याकडे असेल. आई-वडिलांची परवानगी असेल, तरच विद्यार्थ्याला शाळेत येण्याची, वर्गात बसण्याची अनुमती दिली जाते. कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत येण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. शाळेत आलेल्या विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रिनिंग केल्यानंतरच त्याला प्रवेश दिला जात आहे.