तिरुवनंतपुरम : केरळमध्ये बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने २६ जणांचा बळी घेतला असून राज्यात मदतकार्यासाठी लष्कर, हवाई दल व नौदलाला पाचारण करण्याची मागणी केंद्राकडे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली आहे.आशियातील सर्वांत मोठे वक्राकार धरण म्हणून नावाजलेले केरळमधील इडुक्की धरण या पावसाने भरून वाहू लागले असून त्यातून तब्बल २६ वर्षांनंतर गुरुवारी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कोची विमानतळावर विमाने उतरविण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे.मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले, राज्यातील २२ धरणांचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा राज्यातील सहा जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला असून, मदतकार्यासाठी तीनही सेनादलांना पाचारण करण्यात यावे, असे केंद्राला कळविले आहे.केरळमधील सहा जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये गुरुवारी बंद होती तसेच अत्यावश्यक काम नसेल तर प्रवास टाळावा, अशी सूचना राज्यातल्या डोंगराळ भागातील रहिवाशांना देण्यात आली आहे.प्रचंड पावसामुळे वायनाड जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून त्याचा इतर भागांशी संपर्क तुटलेला आहे. केरळच्या उत्तर भागात पावसामुळे दरडी कोसळून व अन्य दुर्घटनांत २० जण ठार झाले आहेत. त्याशिवाय १० जण बेपत्ता आहेत.>२६ वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडले इडुक्की धरणाचे दरवाजेपाच दरवाजे असलेल्या चेरुथोनी धरणातील एक दरवाजा उघडून त्यातून प्रति सेकंदाला ५० हजार लीटर या वेगाने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ४५ वर्षे जुने इडुक्की धरण गेल्या २६ वर्षांत कधीही पूर्णपणे भरले नव्हते. पण यंदा ती वेळ आली. इडुक्की जलाशयावर एकूण तीन धरणे आहेत. त्यातील सर्वांत जास्त जलसाठ्याची क्षमता असलेले पेरियर धरण हे दोन टेकड्यांमध्ये बांधले असून त्याला जलविसर्गासाठी दरवाजे नाहीत. इडुक्की जलाशयावर अजून चेरुथोनी व कुलामावू ही दोन धरणे आहेत. त्यातील चेरुथोनी धरणाचे दरवाजे पूर्णपणे न उघडता अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.आहे."