नवी दिल्ली- भारतीय रेल्वे चोरांची हक्काची जागा बनल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वेतील बोल्ट, टॉवेल, कांबळ, वॉश बेसिन आणि तांब्याच्या तारा चोरणाऱ्या एकूण 11 लाख चोरांना 2016 मध्ये पकडलं. रेल्वेतील सामानांपासून रेल्वे ट्रॅकची चोरी करताना या चोरांना पकडण्यात आलं आहे. यात महाराष्ट्र नंबर वनवर असून एकट्या महाराष्ट्रातूनच 2 लाख 23 हजार चोरांना पकडण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातून 1 लाख 22 हजार चोरांना पकडण्यात आलं आहे.
रेल्वेच्या सामानाची चोरी करण्यामागे महाराष्ट्रातील चोर अव्वल असल्याचं पाहायला मिळतं आहे. रेल्वेच्या सामानाची चोरी करताना महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त चोर पकडले गेले आहेत. महाराष्ट्रातून एकुण 2 लाख 23 हजार चोर पकडले गेले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. उत्तर प्रदेशातून 1 लाख 22 हजार चोरांना पकडण्यात आलं आहे.
आरपीएनने लोकांना फिशप्लेट्स, बोल्ट्स, तारा, ट्यूबलाइट, पंखा, टॉवेल आणि ब्लॅन्केट चोरताना पकडलं आहे. या प्रकरणांमध्ये मध्यप्रदेशातू जवळपास 98 हजार लोकांना अटक करण्यात आलं. तर तामिळनाडूतून 81 हजार 408 आणि गुजरातमधून 77 हजार 047 लोक पकडली गेली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चांगल्या दर्जाच्या तारा आणि तांब्याच्या वस्तूंवर चोर निशाणा साधतात. तसंच रेल्वे स्टेशनवर उभी असलेल्या ट्रेनच्या कोचमधून सामानाची चोरी करतात.
उत्तर रेल्वे झोनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गौरव बंसल यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशात लोक लोखंडाची चेन फेकून विद्युत प्रवाह बंद करायचे आणि त्यानंतर तांब्याच्या तारांची चोरी करायचे. तसंच रेल्वे ट्रॅकच्या काही भागांची चोरीही केली जाते. एक मीटर ट्रॅकचा तुकडा जवळपास साठ किलो वजनाचा असतो. ज्याची किंमत चांगली मिळते. एक मीटर लांबीच्या ट्रॅकला भंगारात एक हजार रूपये किंमत मिळते.
काही चोरांनी तेजस एक्सप्रेस आणि महामना एक्सप्रेसमधील नळही गायब केले. लोखंडाच्या ब्रेक ब्लॉकची चोरी वाढल्याने या चोरांना वैतागून रेल्वेने चाकांच्या खाली फायबरचे ब्रेक ब्लॉक लावण्यास सुरुवात केल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं.