शाब्बास पोरी! कोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीने रिक्षा चालवून साथ दिली; कुटुंबाची जबाबदारी घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:46 AM2021-01-18T11:46:11+5:302021-01-18T11:50:46+5:30
Banjeet Kaur : काहींनी परिस्थिती समोर हार न मानता संकटांचा सामना केला आहे. आपल्या जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावरचं पोट असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याच दरम्यान काहींनी परिस्थिती समोर हार न मानता संकटांचा सामना केला आहे. आपल्या जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. अशीच काहीशी घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी एका लेकीने रिक्षाचं स्टेअरिंग हाती धरल्याची घटना समोर आली आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये वडिलांची नोकरी गेल्याने कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने रिक्षा चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बंजीत कौर (Banjeet Kaur) असं 21 वर्षीय मुलीचं नाव असून ती जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्याची रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंजीतचे वडील एका स्कूल बसवर ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मात्र कोरोना संकटात लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने त्यांची नोकरी गेली. त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी सुरुवातीला रिक्षा चालवली. मात्र त्यातून त्यांच्या कुटुंबाची गरज भागेल इतकं उत्पन्न त्यातून मिळत नव्हतं म्हणून वडिलांना मदत करायचं ठरवलं असं बंजीतने म्हटलं आहे.
"मुलींनी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असलं पाहिजे. कॉलेजचा अभ्यास करत असतानाच त्यासोबत रिक्षा चालवते. एखाद्या पार्ट टाईम जॉबप्रमाणे मी हे करते" अस बंजीतने म्हटलं आहे. तिच्या या निर्णयाचा कुटुंबियांना देखील अभिमान आहे. तिच्या बहिणीने तिच्या निर्णयात तिला पाठिंबा दिला आहे. रिक्षा चालवून वडिलांना मदत करत असल्याने 21 वर्षीय बंजीतचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. बंजीतला सुरक्षा दलामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. त्यासाठी ते अभ्यास देखील करत आहे.
बंजीतचे वडील सरदार गोरख सिंग यांनी "आपली लेक रिक्षा चालवते त्याचं समर्थन केलं आहे. मुली आता प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करत आहेत. लॉकडाऊनमध्ये माझी नोकरी गेली. तेव्हा मुलीने रिक्षा चालवण्याची परवानगी मागितली. तिच्या रिक्षा चालवण्याच्या निर्णयामुळे मला खूप मदत होत आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो" असं म्हटलं आहे. तसेच उधमपूरच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO) रचना शर्मा यांनी वडिलांच्या मदतीसाठी रिक्षा चालवणाऱ्या बंजीत कौर सारख्या मुली समाजासाठी उत्तम उदाहरण आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चिमुकलीने पाच जणांच्या आयुष्याला दिली संजीवनी, ठरली सर्वात लहान वयाची डोनर https://t.co/wah1S43UWQ#OrganDonation
— Lokmat (@MiLOKMAT) January 14, 2021