२२ हजार रोकड, ४९ हजार बँकेत, १३ गाई अन् १० वासरे; नितीश कुमारांची संपत्ती जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 08:23 AM2024-01-01T08:23:24+5:302024-01-01T10:52:04+5:30
नितीश कुमार यांचे सरकार दरवर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व मंत्रिमंडळातील प्रत्येकाची संपत्ती सार्वजनिक करते.
पाटणा - २०२३ च्या अखेरच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांची मालमत्ता जाहीर केली आहे. बिहार सरकारच्या वेबसाईटवर लोकांसाठी ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे १.२३ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यात २२ हजार ५५२ रोकड आणि विविध बँक खात्यात मिळून ४९ हजार २०२ रुपये जमा आहेत.
याशिवायच नितीश कुमार यांच्याकडे ११.३२ लाख रुपयांची फोर्ड इकोस्पोर्ट कार, १.२८ लाख रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची अंगठी आणि अन्य संपत्ती, ज्यामध्ये १.४५ लाख रुपयांच्या १३ गाई, १० वासरे, व्यायामासाठी एक सायकल, माइक्रोवेव ओवन यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत द्वारका येथे एक अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत २००४ मध्ये १३.७८ लाख रुपये होती आता ही किंमत १.४८ कोटी झाली आहे. मागील वर्षी नितीश कुमार यांच्याकडे एकूण संपत्ती ७५.५३ लाख इतकी होती. मालमत्तेत झालेली वाढ ही मुख्यत: दिल्लीतील अपार्टमेंटच्या किंमतीचे वाढलेले दर आहेत.
नितीश कुमार यांचे सरकार दरवर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व मंत्रिमंडळातील प्रत्येकाची संपत्ती सार्वजनिक करते. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ या काळात एकूण उत्पन्न ४.७४ लाख घोषित केले आहे. त्यांच्याकडे ५० हजार रुपये रोकड आहे. तर पत्नी राजश्री यांच्याकडे १ लाख रोकड आहे. त्यांचे मोठे भाऊ तेजप्रताप जे सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांच्याकडे एकूण ३.५८ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
अलीकडेच JDU ची कमान नितीश कुमारांच्या हाती...
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. ललन सिंह यांना अखेर राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून राजीनामा द्यावा लागला. लालूप्रसाद यादव व ललन सिंह हे नितीशकुमार यांना हटवून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात होते असा आरोप केला जात आहे. नितीशकुमार यांचे ३५ वर्षे निकटवर्तीय राहिलेले ललन सिंह यांना पक्षाचे अध्यक्षपद सोडावे लागले. जदयूच्या सूत्रांनी सांगितले की, बिहारमध्ये ललन सिंह जदयूच्या १२ आमदारांना फोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, नितीशकुमार यांनी त्यांचा डाव उलटवला.