२२ कोटी टन सोने! बिहारमध्ये साठा; खाणकामासाठी राज्य परवानगी देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 06:22 AM2022-05-29T06:22:02+5:302022-05-29T06:22:08+5:30
जमुईतील सोन्याचे साठे भूगर्भातून बाहेर काढण्यासाठी खाणकाम करण्याबाबत बिहार सरकार केंद्रीय यंत्रणांशी एक महिन्याच्या आत समझोता करार करणार आहे.
पाटणा : देशातील सर्वांत मोठा सोन्याचा साठा बिहारमधील जमुई जिल्ह्याच्या भूगर्भात सापडला आहे. या ठिकाणी खाणकाम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे.
जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (जीएसआय) दिलेल्या माहितीनुसार जमुई येथे भूगर्भात २२ कोटी टनांहून अधिक सोने व ३७.६ टन अन्य मौल्यवान खनिजांचा साठा आहे. सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जमुईत भूगर्भातून सोन्याचा साठा बाहेर काढण्याकरिता खाणकाम करण्यास परवानगी देण्याचा विचार सुरू आहे.
जमुईतील सोन्याचे साठे भूगर्भातून बाहेर काढण्यासाठी खाणकाम करण्याबाबत बिहार सरकार केंद्रीय यंत्रणांशी एक महिन्याच्या आत समझोता करार करणार आहे. देशातील सर्वांत मोठा सोन्याचा साठा बिहारमध्ये आहे, अशी माहिती केंद्रीय खाण खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभेमध्ये दिली होती.
कुठे आहेत साठे?
बिहारच्या जमुई जिल्ह्यातील कर्मातिया, झाझा, सोनो या ठिकाणी भूगर्भात सोन्याचे मोठे साठे असल्याचे जीएसआयने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले होते. ही माहिती बिहारच्या अतिरिक्त मुख्य सचिव व खाण खात्याच्या आयुक्त हरजोत कौर बम्हरा यांनी दिली.
४४% साठा बिहारमध्ये
देशामध्ये ५० कोटी टनांहून अधिक सोन्याचा साठा भूगर्भामध्ये दडला असून, त्याच्या ४४ टक्के साठा एकट्या बिहारमध्ये आहे. सोन्याच्या या खाणीमुळे बिहारच्या महसुलातही मोठी भर पडण्याची शक्यता आहे.