२३४ विद्यापीठेच परीक्षेस तयार; १७७ विद्यापीठांत अनिश्चितता; यूजीसीचा परीक्षा घेण्याचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:29 AM2020-07-17T03:29:11+5:302020-07-17T06:52:03+5:30
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात, असे आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यांना कळविले होते. त्याआधी आयोगाने सर्व विद्यापीठांकडून त्यांच्या परीक्षांची स्थिती काय आहे, याची माहिती मागविली होती.
नवी दिल्ली : पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास देशातील २३४ विद्यापीठे तयार असून, १७७ विद्यापीठांनी मात्र परीक्षा कधी घ्यायच्या, हे अद्याप ठरविलेले नाही. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पदवी देणे योग्य होणार नाही अशी भूमिका घेऊन विद्यापीठांनी या परीक्षा घ्याव्यात असा आग्रह विद्यापीठ अनुदान आयोगाने धरला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अनिश्चतता आहे.
देशातील तब्बल १७७ विद्यापीठांनी या परीक्षा घेणार का किंवा केव्हा घेणार याविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात, असे आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यांना कळविले होते. त्याआधी आयोगाने सर्व विद्यापीठांकडून त्यांच्या परीक्षांची स्थिती काय आहे, याची माहिती मागविली होती. एकूण ९९३पैकी ६६० विद्यापीठांनी अशी माहिती कळविली आहे. त्यात १७७ विद्यापीठांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे कळविले आहे. यावरून असे दिसते की,४५४ विद्यापीठांच्या परीक्षा मार्गी लागल्या आहेत वा होण्याच्या मार्गावर आहेत. १८२ विद्यापीठांनी आॅनलाइन वा आॅफलाइन पद्धतीने परीक्षा पूर्ण केल्या आहेत. आणखी २३४ विद्यापीठांनी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचा कार्यक्रम आखला आहे तर ३८ विद्यापीठांनी संबंधित वैधानिक संस्थांच्या निदेर्शांनुसार परीक्षा घेण्यात येतील, असे कळविले आहे. कोरोनाची साथ निवळली नसताना परीक्षा घेणे मुलांच्या पालकांनाही धोक्याचे वाटत आहे.
महाराष्ट्रासह, दिल्ली, ओडिशा राज्यांचा ठाम नकार
महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास ठाम कार दिला आहे. तरीही अयोग मात्र परीक्षा घेण्याच्या अग्रहावर कायम आहे. कायद्यानुसार राज्य सरकारेही विद्यापीठांना परीक्षा न घेताच पदव्या देण्यास सांगू शकत नाहीत, असे आयोगाचे म्हणणे आहे.