नवी दिल्ली - देशासह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनचा तडाखा नागरिकांना बसला आहे. भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 2391 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मान्सूनमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 2391 जणांना जीव गमवावा लागला आहे. यंदा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकसभेत मंगळवारी (19नोव्हेंबर) याबाबत माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मान्सूनमुळे देशातील 2391 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आठ लाखांपेक्षाही अधिक घरांची हानी झाली असल्याची माहिती दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) 176 पथकांनी 98,962 नागरिकांची सुटका केली आणि देशातील 23,869 नागरिकांना वैद्यकीय मदत करण्यात आल्याची माहिती राय यांनी दिली आहे. पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे 15,729 जनावरे बेपत्ता झाली आणि 63,975 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 22 राज्यांमध्ये जवळपास 25 लाखांहून अधिक लोकांना पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. भूस्खलनच्या समस्येचाही सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात 382 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पूर आणि वीज पडल्याने 227 जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण 357 जिल्ह्यांना यावर्षी पावसाळ्यात पूर व दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांचा सामना करावा लागला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे 738 लोक जखमी झाले. तर सुमारे 20 हजार जनावरे मृत्युमुखी पडली. पाऊस व पुरांमुळे 1.09 लाख घरे पडली आणि 2.05 लाख घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या पुरांमुळे तब्बल 14.14 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकेही नष्ट झाली होती
‘क्यार’, ‘महा’ आणि ‘बुलबुल’ अशी एकावर एक चक्रीवादळे येत असतानाच हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे यंदा ऑक्टोबरसह नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबर 2019 च्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे 46 मिमी पावसाची नोंद झाली असून, 2010 नंतरचा हा जास्त पाऊस असलेला यंदाचा नोव्हेंबर महिना आहे. ऑक्टोबरच्या मध्यानंतर पाऊस कोसळत नाही. क्वचित हलक्या सरी कोसळतात. मात्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस कोसळला. सांताक्रुझ वेधशाळेत नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी शहराच्या जवळच असलेल्या चक्रीवादळ ‘महा’मुळे 46 मिमी पावसाची नोंद झाली.