कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय सोडून 24 वर्षीय सीए तरुणाने घेतली दीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:24 AM2018-04-20T10:24:05+5:302018-04-20T10:24:05+5:30
मुंबईतील एका बड्या व्यावसायिक कुटुंबातील मुलाने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदाबाद- मुंबईतील एका बड्या व्यावसायिक कुटुंबातील मुलाने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मोक्षेष शेठ (वय 24)असं या तरूणाचं नाव असून प्रसिद्ध जेके कॉर्पोरेशन ही नामांकित कंपनी त्याच्याच कुटुंबीयांच्या मालकीची आहे. गांधीनगर-अहमदाबाद मार्गावरील तपोवन सर्कलमध्ये झालेल्या एका सोहळ्यात मोक्षेशने दीक्षा घेतली.
मोक्षेषचं कुटुंब उत्तर गुजरातच्या दीसामधील आहे. पण गेल्या 60 वर्षापासून ते व्यावसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत. मोक्षेषचे वडील संदीप आणि काका गिरिश शेठ अजूनही एकत्र कुटुंबात राहतात. मोक्षेषला दोन लहान भाऊ आहेत. वाळकेश्वरमधील मानव मंदिर शाळेत त्याचं शिक्षण झालं असून त्याने दहावीमध्ये 93.38% टक्के मिळविले होते. तर बारावीमध्ये त्याने 85% टक्के मिळविले.
बारावीनंतर मोक्षेषने एचआर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सीएटी डिग्री घेतल्यानंतर सांगलीमध्ये घरच्या व्यवसायाला हातभार लावायला सुरूवात केली. मोक्षेषला लहानपणापासूनच आध्यात्मात आवड होती. आठ वर्षाआधी त्याने दीक्षा घेण्याची इच्छा बोलून दाखविली होती. पण त्यानंतर घरच्यांनी त्याला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला, अशी माहिती मोक्षेषच्या काकाने दिली आहे.
मोक्षेष शेठ हा त्याच्या कुटुंबातील दीक्षा घेणारा पहिला व्यक्ती आहे. पैशांनी सगळं विकत घेता आलं असतं तर सगळे श्रीमंत लोक आनंदी असते. प्रत्येक गोष्ट मिळविल्याने मानसिक समाधान मिळत नाही. उलट काहीतरी राहिल्यासारखं वाटतं, असं मोक्षेषचं म्हणणं आहे.