अहमदाबाद- इंटरनेटच्या माध्यमातून जग जरी जवळ आलं असलं तरी त्याचा सकारात्मकदृष्ट्या वापर होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून अनेकदा एखाद्यावर पराकोटीची टीकासुद्धा केली जाते. त्याप्रमाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना मदतही मिळाली आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे.फेसबुकच्या एका पोस्टमुळे कर्करोगानं पछाडलेल्या एका तरुणाला थोडी थोडकी नव्हे, तर 25 लाखांची मदत मिळाली आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुक पेजवर त्या तरुणाची पोस्ट टाकण्यात आली आणि त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून भरघोस मदत मिळाली. मूळचा गुजरातचा असणाऱ्या ऋषी नावाच्या तरुणाला कर्करोगासारख्या दुर्दम्य आजारावरील उपचारांसाठी अवघ्या 15 तासांत 25 लाखांची मदत मिळाली आहे. कर्करोगावरील उपचाराचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्यातच ऋषीच्या वडिलांना महिना 15 हजार पगार मिळतो.ऋषीच्या शिक्षणासाठी वडिलांनी कसे बसे 13 लाख रुपये जमवले होते. परंतु ते सर्व पैसे त्याच्या आजारपणावरच खर्च झाले. ऋषीचेही एमबीए करून चांगली नोकरी करण्याचा स्वप्न होतं. परंतु त्याला कर्करोगानं पछाडलं आणि त्याची सर्व स्वप्नं धुळीस मिळाली. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या संस्थेनं फेसबुकवरून नेटक-यांना आवाहन केल्यानंतर त्याला 25 लाखांची मदत मिळाली आहे. सध्या ऋषीवर केमोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे उपचार सुरू आहेत.
कर्करोगानं पछाडलेल्या 'त्या' तरुणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून 25 लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 7:32 AM