नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ईशानगर परिसरातील घाघरा नदीमध्ये बोट बुडाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे. एका बोटमधील दहा जण हे सध्या बेपत्ता आहेत. तर आणखी एक बोटमधील 15 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून प्रशासनाची टीम देखील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूरच्या धौरहरामधील ईशानगर ठाण्याच्या मिर्जापूर गावाजवळ असलेल्या नदीमध्ये बोट पलटी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाघरा नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा जास्त असल्याने ही दुर्घटना घडली. बेपत्ता असलेल्या लोकांचा नेमका आकडा सांगणं कठीण आहे. ही संख्या कमी किंवा जास्त असल्याचं देखील लोकांनी म्हटलं आहे. मटेरा जवळ झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 लोक बेपत्ता आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत
मिर्जापूर गावातील लोकांची नदीच्या दुसऱ्या बाजुला शेती असल्याने ते जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी नेहमीच जात असतात. पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांना वाचवण्यासाठी वेगाने बचावकार्य सुरू आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.