आगरतळा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या त्रिपुरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्रिपुरात सध्या गाजत असलेल्या एका घटनेवरून याचे प्रत्यंतर येत आहे. भाजपात प्रवेश केल्यामुळे दक्षिण त्रिपुरात 25 मुस्लिम कुटुंबीयांना मशिदीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या कुटुंबांना स्वत:साठी नवी मशीद तयार करावी लागली. शांतीबाजार विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मोईदतिला गावात हा प्रकार घडला. या गावात राहणाऱ्या 100 कुटुंबीयांपैकी 83 कुटुंब ही मुस्लिम आहेत. यापैकी 25 कुटुंबांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी रीतसर पक्षात प्रवेशही केला. मात्र, त्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी या कुटुंबांना मशिदीत प्रवेश नाकारला. त्यामुळे या गावकऱ्यांनी गावामध्ये स्वत:साठी वेगळी मशीद तयार केली. आम्ही 16 महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आम्हाला मशिदीमध्ये नमाज पढण्यास मज्जाव करण्यात आल्याचे बाबुल हुसेन यांनी सांगितले. जोपर्यंत हिंदुत्ववादी पक्षाला समर्थन द्याल तोपर्यंत इथं नमाज पढता येणार नाही असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही लोकांनी गावात वेगळी मशीद बांधल्याचे हुसेन यांनी सांगितले. या मशिदीत इमामाची नियुक्ती करण्यात आली असून 25 कुटुंबांकडून त्यांना पगार दिला जातो. भाजपा केवळ हिंदुत्त्ववादी पक्ष आहे, असे आम्हाला वाटत नाही. देशभरात मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे भाजपा नसून काँग्रेस आणि सीपीएम सारखे पक्ष आहेत. ज्या मुस्लिमांना मारहाण झाली असेल ते नक्कीच काहीतरी चुकीचे वागले असतील. अन्यथा चांगल्या लोकांवर विनाकारण हल्ले का होतील? , असा सवाल बाबुल हुसेन यांनी उपस्थित केला. काँग्रेस संपल्यातच जमा आहे. डाव्यांनी 25 वर्षे सत्ता उपभोगली, परंतु आपल्या पदरात काहीही पडलं नसल्याचे हुसेन यांनी म्हटले. त्यामुळे भाजपाची सत्ता आली तर आमच्या समस्या सुटतील अशी आशा हुसेन यांनी व्यक्त केली.
भाजपात प्रवेश केल्याने मुस्लिम कुटुंबांना मशिदीत प्रवेश नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 2:59 PM