Coronavirus: इटलीहून विशेष विमानाने 263 विद्यार्थी भारतात, सर्वजण आयटीबीपीच्या छावला कॅम्पमध्ये रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 11:33 AM2020-03-22T11:33:25+5:302020-03-22T11:39:21+5:30
आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. इटलीमध्ये तर एकाच दिवसात तब्बल 800 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जगात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आज येथून एअर इंडियाच्या विशेष विमानाने 263 भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले.
एयर इंडियाचे हे विमान आज सकाळी 9:15 वाजता दिल्ली विमान तळावर पोहोचले. येथे थर्मल स्क्रीनिंग आणि इमिग्रेशननंतर या सर्व विद्यार्थांना आयटीबीपी छावला कॅम्पमध्ये क्वारेंटाइनमध्ये पाठवण्यात आले.
संपूर्ण देशात आज सकाळी सात वाजल्यापासून जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. देशात कोरोना व्हायरस संक्रमानाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. ही संख्या आता 315वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 27वर पोहोचली आहे.
आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
रोममध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासठी एअर इंडियाने 787 ड्रिमलाइनर विमान पाठवले होते. गेल्या काही दिवसांपासून भारताने कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या चीन, जापान आणि ईरान सारख्या देशांतून शेकडो नागरिकांना भारतात आणले आहे. सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे, की 22 मार्चपासून एक आठवड्यापर्यंत कुठल्याही देशाचे विमान भारतात येऊ दिले जाणार नाही.
सरकारने सर्व अंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याच्या एक दिवस आधी एम्सटर्डम विमानतळावर अडकलेल्या 100 भारतीय नागरिकांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. हे सर्वजण अमेरिकेहून भारतात येत होते. नवीदिल्लीत पोहोचण्यासठी केवळ दोन तास शिल्लक असतानाच यांचे विमान पुन्हा परत निघून गेले होते. एम्सटर्डम येथे अडकलेल्या भारतीयांमध्ये संजय सप्रा देखील आहेत. त्यांच्या पत्नी टीना सप्रा यांनी नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहून आपल्या पतीला आणि इतर भारतीय नागरिकांना मदत करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक विशेष विमान पाठवण्याचीही विनंती केली आहे.
मलेशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याची मागणी -
केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना मलेशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना भारतात आणण्यावर लक्ष द्यावे असे म्हटले आहे. आपल्या पत्रात विजयन यांनी येथे जवळपास 250 विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. भारताने दुसऱ्या देशांतील विमानांना यायला बंदी घातल्याने ते तेथे अडकले आहेत.